विकासाच्या मार्गावर चालत असताना जगभरातील वातावरणावर वाईट प्रभाव पडत आहे. प्रदूषणामुळे हवा दिवसेंदिवस अधिक दुषित होत आहे. काही दिवसांपूर्वी 'कार्बन' नावाची एक शॉर्टफिल्म आली होती. यात दाखवण्यात आलं होतं की, जिवंत राहण्यासाठी लोकांना ताजी हवा विकत घ्यावी लागत आहे. अशीच एक घटना न्यूझीलंडमध्ये समोर आली आहे.
न्यूझीलंडमधील ऑकलंड एअरपोर्टवर 'पवित्र हवा' बॉटलमध्ये भरुन विकली जात आहे. हवा विकणाऱ्या Kiwiana या कंपनीने बॉटलवर लिहिले आहे की, 'न्यूझीलंडची शुद्ध आणि ताजी हवा'. आणि या हवेच्या ४ बॉटलची किंमत साधारण १०० डॉलर(7,400 रुपये) इतकी आहे.
कंपनीने दावा केला आहे की, या बॉटलमध्ये भरण्यात आलेली हवा ही जगातली सर्वात पवित्र हवा आहे. ही हवा न्यूझीलंडच्या प्रसिद्ध एल्पसच्या डोंगरातील आहे. ही हवा ५ लिटरच्या कॅनिस्टरमध्ये भरुन विकली जात आहे. प्रत्येक कॅनिस्टरमध्ये साधारण १३० ते १४० श्वास घेता येतील इतकी हवा भरली गेली आहे.
आता लवकरच हे प्रॉडक्ट जगभरातील शहरांमध्ये दिसायला लागण्याची शक्यता आहे. कारण स्वच्छ हवेसाठी लोक अनेक पर्याय शोधत असतात मग आता त्यांना हा पर्याय फायद्याचा वाटू शकेल.