जभरात कोरोना विषाणूनं कशापद्धतीचं थैमान घातलं आहे हे तर आपण पाहातच आहोत. सध्याच्या कठीण काळात कोरोना विरोधी लस देवदूत ठरत आहे. कोरोना विरोधी लसीच्या शस्त्राच्या माध्यमातून संपूर्ण जग सध्या विषाणूविरोधातील युद्ध लढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांचं म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान आहे यात कोणतंच दूमत नाही. या सर्वातून एक हटके आणि कल्पनाशक्तीला कशाचीच तोड नसते याचं एक उदाहरण एका नर्सनं दाखवून दिलं आहे. एका नर्सनं चक्क कोरोना विरोधी लसीकरणाच्या रिकाम्या कुप्यांचा टाकाऊपासून टिकाऊ असा वापर केला आहे. तिनं रिकाम्या कुप्यांपासून एक झगमगता झुंबर तयार केला आहे.
लसीच्या रिकाम्या कुपींचा वापर करुन तयार करण्यात आलेलं झुंबर हे लारा वेसिस या नर्सनं साकारलं आहे. ती अमेरिकेच्या कोलारॅडो येथील रहिवासी आहे. कोरोना लसीच्या रिकाम्या कुप्या पाहून तिला याचा वापर करुन काहीतरी चांगलं करता येईल अशी कल्पना आली. त्यानंतर तिनं यापासून झुंबर तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रिकाम्या कुप्यांसह काही तारांचाही वापर केला. तिनं सर्वात आधी एक फ्रेम विकत घेतली आणि त्यावरच रिकाम्या कुप्या उलट्या टांगून त्यावर रोषणाई केली.
"ज्या पद्धतीनं कोरोना विरोधी लसी सर्वांच्या जीवनात रोषणाई आणत आहेत. त्याच पद्धतीनं या रिकाम्या कुप्यांचा वापर करुन तयार केलेलं हे झुंबर देखील रोषणाईनं नटलं आहे. आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा सन्मान मी या माध्यमातून करू इच्छिते", असं लारा वेसिस हिनं म्हटलं आहे.