दुपारी जेवण झाल्यानंतर ऑफिसमध्ये काम करताना डोळ्यावर झापड येते, पेंग येऊ लागते हा सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्या देशात किंवा पाश्चात्य देशांमध्येही हे आळशीपणाचं लक्षण मानलं जातं. आपण अनेकदा ऑफिसमध्ये किंवा अन्य कामांवर असणाऱ्या व्यक्ती खुर्चीत बसून डुलक्या घेताना दिसल्यास ते अत्यंत चुकीचं मानलं जातं. असं कोणी आढळल्यास त्याची तक्रार केली जाते किंवा त्या व्यक्तीवर कर्तव्यावर असताना झोपल्याबद्दल कारवाईही केली जाऊ शकते; पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की एका देशामध्ये ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत डुलकी घेणं अजिबात चुकीचं मानलं जात नाही.
उलट तिथं अशी डुलकी घेण्यास परवानगी आहे आणि विशेष म्हणजे हा देश आहे जपान (Japan), ज्या देशात अत्यंत काटेकोरपणे शिस्त, नियम पाळले जातात. कामाच्या वेळेत नियमबाह्य वर्तन केल्यास, फसवेगिरी केल्यास कठोर शिक्षा केली जाते. त्याच जपानमध्ये ऑफिसमध्ये दुपारी डुलकी (Nap) घेण्याला परवानगी आहे.
रोज रात्री चांगली झोप झाली, तर आपली ऊर्जा पुढच्या दिवसासाठी टिकून राहते. झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशीही दिवसभर झोप येऊ लागते. अगदी ऑफिसमध्ये कामाच्या वेळेतही (office Duty Hours) झोप येते. तसंच दुपारी जेवण झाल्यानंतर डुलकी (Nap) येणं हीदेखील स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र भारतासह (India) इतर काही देशांमध्ये हे अजिबात चांगलं मानलं जात नाही; पण जपानमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये झोपलात (Office Nap Allowed in Japan) तर काही फरक पडत नाही.
जपानमध्ये अनेक ऑफिसेसमध्ये लोक डुलकी घेताना दिसतात. बाहेरून बघणाऱ्यांना हे विचित्र वाटतं; पण जपानमधल्या नागरिकांसाठी हे सर्वसामान्य आहे. तिथे कोणालाही त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी झोपलेलं असलेलं पाहणं हे विचित्र वाटत नाही. जपानमध्ये पॉवर नॅप (Power Nap) ही संकल्पना प्रचलित आहे. त्याद्वारे ते स्वतःला उल्हसित ठेवतात. लोकांचा असा विश्वास आहे, की तुम्ही ऑफिसमध्ये मेहनत केली असल्यानं तुम्हाला थकवा आला आणि झोप लागली. त्यामुळं ऑफिसमध्ये कोणी डुलकी घेताना दिसलं तर कोणीही त्याला आक्षेप घेत नाही.
जपानमध्ये या प्रथेला इन्मुरी (Inemuri)अशी खास जपानी संज्ञा आहे. याचा अर्थ कर्तव्यावर असताना झोपणं (Sleeping during Duty Hours) असा होतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जपानमध्ये ही प्रथा शतकानुशतकं चालू आहे. इथं लोक केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर शॉपिंग सेंटर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, कॅफे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्येही झोपतात. एवढंच नव्हे, तर ते शहरातल्या फूटपाथवरही झोपू शकतात. त्यात काहीही वावगं मानलं जात नाही. उलट अशी काही मिनिटांची पॉवर नॅप घेऊन लोक अधिक ऊर्जेने, उत्साहानं काम करतात असं मानलं जातं. त्यामुळं जपानमध्ये ऑफिसमध्ये कोणी डुलकी काढताना दिसलं तर त्यात आश्चर्य मानलं जात नाही.