ऑनलाइन लोकमत -
भोपाळ, दि. 22 - वीजपुरवठा खंडित झाल्याने डॉक्टरांना चक्क बॅटरीच्या उजेडात शस्त्रक्रिया करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्वालियरच्या कमलराजा रुग्णालयात ही घटना घडली आहे. मंगळवारी डॉक्टरांना दोन महत्वाच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या, पण ऐनवेळी वीज गेल्याने त्यांना बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागला.
कमलराजा रुग्णालयात सकाळी 10 वाजता दोन महिलांवर वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रिया सुरु होती. मात्र अचानक वीज गेल्याने दोन्ही ऑपरेशन थिएटर्समध्ये पुर्ण अंधार झाला. जनरेटर सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर बॅटरीच्या उजेडाचा आधार घेत सर्जरी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांकडून मिळाली आहे. 15 मिनिटानंतर वीजपुरवठा पुर्ववत झाला.
गायनाकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ ज्योती बिंदाल यांनी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ जे एस सिकरवर यांना तात्काळ फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.