आजची जी तरुण पिढी आहे, त्यांच्या पालकांना विचारा. त्यांच्या लहानपणी ते काय करत होते? त्यांचा दिवस कसा जात होता? खेळायला, टाइमपास करायला त्यांच्याकडे कोणती साधनं, कोणती गॅझेट्स होती? - खरं तर त्यावेळी फारशी काही साधनं नव्हती. शहरात चित्रपटगृहं सोडली तर करमणुकीसाठी इतर गोष्टीही फारशा नव्हत्या. सटी-सहामाही एखादा सिनेमा पाहिला तरी त्यावेळी त्यांना खूप भारी वाटायचं. पण, तरीही ते फारसं बोअर कधी झाले नाहीत, नसतील. या पिढीशी बोललं तर ते तेच सांगतात, आम्ही फारसं कधी बोअर झालो नाही. बोअरडमनं आम्हाला सतावलं नाही. शिवाय त्यांच्याजवळ एक भरभक्कम आधार होता, तो म्हणजे त्यांची मित्रमंडळी. जिवाला जीव देणारे अनेक जवळचे मित्र त्यांना होते. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष राहून, आपल्या भाव-भावना एकमेकांशी शेअर करत, त्याचा आनंद घेत त्यांचं बालपण, तरुणपण अगदी मजेत गेलं.
आजच्या पिढीसाठी मात्र हरघडी इतकी साधनं उपलब्ध असतानाही त्यांना ‘आता काय करू?’ या प्रश्नानं कायम भंडावून सोडलेलं असतं. ‘मी आता फार बोअर झालोय/झालेय...’ हे वाक्यही त्यांच्याकडून कायम ऐकायला मिळतं. मग त्यांचा हा बोअरडम घालवायला करायचं तरी काय, या प्रश्नानं तरुण मुलं तर बऱ्याचदा अस्वस्थ असतात, पण त्यापेक्षा त्यांचे पालकच जास्त घायकुतीला आलेले असतात. यासंदर्भात अमेरिकेत नुकतंच एक व्यापक संशोधनही झालं. या अभ्यासात सहभागी झालेल्या संशोधकांचं म्हणणं आहे, तुमची मुलं बोअर होतात? त्यांना कंटाळा आलाय? - तर मग ही चांगलीच गोष्ट आहे. कारण मुलांना ज्यावेळी कंटाळा येतो, त्यावेळी नवीन काही तरी करण्याची, शिकण्याची उपजत प्रेरणा त्यांना मिळते आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमची मुलं जर बोअर झाली असतील, तर होऊ द्या त्यांना बोअर. ही चांगलीच गोष्ट आहे. त्यातूनच त्यांची सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी वाढेल.
फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एरिन वेस्टगेट मुलांच्या या स्थितीची तुलना कारच्या डॅशबोर्डवरील इंडिकेटरशी करतात. त्या म्हणतात, मुलगा बोअर होतोय म्हणजे तो जे करतोय त्यात त्याला काहीच मजा येत नाही. सध्या ज्या गोष्टी त्याच्या पुढ्यात आहेत, त्या एकतर त्याच्यासाठी खूप सोप्या आहेत किंवा खूप अवघड. अशा वेळी मुलांना त्यात मजा तरी काय येणार आणि ते शिकणार तरी काय? मुलांचा हा ‘इंडिकेटर’ पालकांच्या लक्षात आला आणि त्यांनी मुलांना थोडीशी मदत केली, तरी त्यांचा हा बोअरडम कुठल्या कुठे पळून जाईल आणि आपल्या ध्येयाच्या दिशेनं ते धावायला लागतील. ‘द हॅपी किड’ या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका केटी हर्ले म्हणतात, मुलं जेव्हा एकटी असतात, करण्यासाठी काही आकर्षक किंवा आवडीच्या गोष्टी त्यांच्याकडे नसतात, त्याचवेळी ‘मला बोअर होतंय’ची रट मुलं लावतात. नेमक्या या बोअरपणातच काही क्रिएटिव्ह त्यांना करायला मिळालं, ते त्यांच्यात पुढ्यात आलं, तर मग त्यांच्या उत्साहाचा वारू वेगात दौडायला लागतो.
अनेक पालक तक्रार करतात, आमच्या मुलाला/मुलीला स्क्रीनशिवाय होत नाही. अशावेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुलांकडे करण्यासारखं काहीच नाही. तेच ते करून किंवा जे काही ते करताहेत, त्याचा त्यांना कंटाळा आलाय. ते बोअर झाले आहेत. डॉ. वेस्टगेट म्हणतात, तुम्ही मुलांना कधी सोडलंय मोकळं? खुल्या आकाशात, उन-वाऱ्यात, पाऊस-पाण्यात, बोचऱ्या थंडीत, अंधाऱ्या रात्रीची मजा त्यांनी कधी अनुभवलीय? हा टाइमपास नाही आणि वेळेचा अपव्ययही नाही. अशा गोष्टीच त्यांना जगणं शिकवतील आणि आयुष्याचा आनंद मिळवून देतील. अभ्यासाच्या खोलीत कोंडून घेतलेल्या कुबट वातावरणापेक्षा उघड्यावर सोडलेल्या या मुक्त जागीच आपलं ध्येय सापडण्यास त्यांना मदत होईल. नवी जागा आणि एकदमच नव्या अनुभवामुळे इथेही कदाचित ते बोअर होतील, पण स्वत:चा मार्ग ते स्वत:च शोधतील. ‘रस्त्यावर’ आल्यानंतर फुटबॉल खेळायचा की तिथे फुटपाथवरच ठाण मांडून चित्र काढायचं, हे त्यांचं तेच ठरवतील..
घरात तीन चकरा, तीन नव्या आयडिया! डॉ. हर्ले म्हणतात, रिकामटेकडा वेळ मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशावेळी त्यांच्या पुढ्यात पझल्स टाका, पुस्तकं त्यांना दिसू द्या. अभ्यासाचा धोशा त्यांच्यामागे लावण्याऐवजी त्यांना विचारा, चल, तुला एखादी सिरीयल पाहायचीय, कार्टून पाहायचंय की माझ्याबरोबर खेळायचंय? मुलांना आपल्याच घरात तीन चकरा मारायला लावा आणि सांगा त्यांना, नीट पाहा. किमान तीन नव्या आयडिया तरी तुला इथे घरातच मिळतील. त्या घेऊन ये आणि सांग मला. मी बोअर झालोय हा शब्द पुन्हा त्यांच्या तोंडातून निघणार नाही!