Snowstorm In California America: संघर्ष आणि इच्छाशक्तीच्या अनेक कथा तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. हेही पाहिलं असेल की, कसे वाईट स्थितीत लोक आपला जीव वाचवतात. पण अनेकदा हे नशीबावर अवलंबून असतं. पण लोकांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नये. याचं एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका 81 वर्षीय वृद्धाने भीषण बर्फाच्या वादळात स्वत:ला सात दिवस जिवंत ठेवलं आणि सुखरूप बाहेर आले.
ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेरी जोरेट नावाची 81 वर्षीय व्यक्ती 24 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियाच्या बिग पाइनहून नेवादाच्या गार्डनरविलेला जात होती. ठीक यावेळी अचानक वातावरण बदललं आणि रस्त्यातच बर्फवृष्टी सुरू झाली. जेरी यांची SUV कार गिल्बर्टजवळ बर्फाच्या ढिगाऱ्यात अडकली. अनेक प्रयत्न करूनही कार निघू शकली नाही.
ते गाडीत बसले आणि वाट पाहू लागले की, वादळ थांबेल आणि ते बाहेर निघतील. पण असं झालं नाही. हळूहळू बर्फात त्यांची गाडी झाकली गेली आणि त्यांची स्थिती फार वाईट झाली होती. ते एक आठवडा गाडीत अडकून होते. रिपोर्ट्सनुसार, ते गणिताचे प्रोफेसर आणि नासाचे माजी कर्मचारी राहिले होते.
त्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर केला. त्यांनी थोड्या थोड्या वेळाने स्नॅक्स खाणं सुरू केलं. स्वत:ला आणि गाडीला गरम ठेवण्यासाठी त्यांनी बॅटरी पॉवरचा वापर केला. सोबतच ते कॅंडी आणि क्रोइसॅन्टही खात होते.
इतकंच नाही तर कधी कधी ते गाडीची खिडकी उघडून बर्फही खात होते. शेवटी सात दिवसांनंतर त्यांचा संपर्क काउंटी शेरिफ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झाला आणि तेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांचा जीव तर वाचला पण त्यांची तब्येत गंभीर आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.