(प्रातिनिधीक छायाचित्र - जागरण)
नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते हे तुम्हाला माहीत असेलच. तुम्हीही अनेकदा नोकरीसाठी परीक्षा आणि मुलाखती दिल्या असतील. पण हे वाचून तुम्हाला धक्का बसेल की, आता नवरदेव बनण्यासाठीही परीक्षा द्यावी लागत आहे. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही गंमत करतोय. पण नाही हे खरंय. लखनौमध्ये अशी अनोखी परीक्षा घेण्यात आली आहे.
आपल्या देशात लग्नासाठी भलेही आजपर्यंत कोणतीही लिखित परीक्षा नसली तर मुलाखती मात्र मुलींच्याच होत आल्या आहेत. मुलगी मुलासमोर सजून येणार आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार. जेवण करण्यापासून ते घरातील काय काय कामे येतात हे ते प्रश्न असतात. पण आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. मुलींची मुलाखत देण्याची वेळ गेली आहे. आता मुलांना नवरदेव होण्यासाठी परीक्षा द्यावी लागत आहे.
लखनौमध्ये अनाथ मुलींचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेने त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. त्यानुसार २५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाकडून आयोजित एक परीक्षा द्यावी लागली आणि त्यानंतर लागलेला निकालही सर्वांना थक्क करणारा होता.
२५० पैकी २१९ मुलं हे या नवरदेव होण्याच्या परीक्षेत नापास झालेत. म्हणजे २५० पैकी केवळ ३१ मुलंच लग्नासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पास झालेत.
आता ही संस्था त्यांच्या संस्थेतील ३१ मुलींचा सामूहिक विवाह १५ ऑक्टोबरला परीक्षेत पास झालेल्या मुलांशी लावणार आहे. या परीक्षेत २१९ मुलांचं नापास होणं हे सिद्ध करतं की, समाजातील जास्तीत जास्त मुलांमध्ये योग्य पती होण्याचे गुण नाहीयेत. पण आजपर्यंत त्याची कुणी टेस्टच घेतली नाही.
नवरदेवांसाठी ही अनोखी परीक्षा घेणाऱ्या लखनौच्या संस्थेत १८ वर्षांपेक्षा जास्त लग्ना योग्य मुली राहतात आणि ही संस्था त्यांच्यासाठी योग्य वराचा शोध घेते. सर्व मुलींच्या बॅंक खात्यात प्रशासनाकडून २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते आणि १० हजार रुपयांच्या घरातील वस्तू दिल्या जाणार आहेत. या अनाथ मुलींचं लग्न लावून देण्यासोबतच या संस्थेने अशाप्रकारे परीक्षा घेऊन समाजात एक वेगळं उदाहरण ठेवलं आहे.