उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे, एका म्हशीवर दोन जणांनी दावा सांगितला होता. हा वाद मिटवण्यासाठी पंचायतही झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर, खुद्द म्हशीनेच हे प्रकरण सोडवले आणि वाद मिटला.
काय आहे प्रकार? -संबंधित प्रकरण जिल्ह्यातील महेशगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राय अस्करनपूर गावातील नंदलाल सरोज यांच्याशी संबंधित आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची म्हैस बेपत्ता झाली होती. ती भटकून हरिकेश गावात पोहोचली. तेथे हनुमान सरोज नावाच्या एका व्यक्तीने तिला पकडले. तपास सुरू केला असता, संबंधित म्हैस हरिकेश गावातील हनुमान सरोज यांच्याकडे असल्याचे समजले. बुधवारी नंदलाल हनुमान सरोज यांच्या घरी पोहोचले. मात्र, त्यांनी ती म्हैस आपली असल्याचे सांगून देण्यास नकार दिला.
पंचायतीतही सुटलं नाही प्रकरण -यानंतर, हे प्रकरण पंचायतीकडे पोहोचले. मात्र, तेथेही निर्णय होऊ शकला नाही. अखेर हे प्रकरण पेलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, सर्व प्रकारची चौकशी करूनही पोलिसांना निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही.
असा मिटला वाद -वेगवेगळे प्रयत्न करूनही, प्रकरण सुटत नव्हते. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक अवधेश शर्मा यांना एक युक्ती सुचली. त्यांनी नंदलाल आणि हनुमान यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले आणि त्यांच्या गावाच्या वाटेवर विरुद्ध बाजूला उभे राहण्यास सांगितले. यानंतर म्हैस सोडण्यात आली. अखेर ही म्हैस नंदलाल यांच्याकडे गेली आणि अशा पद्धतीने प्रकरण सुटले आणि वाद मिटला. म्हैस नंदलाल यांना देण्यात आली.