कुणाला जर विचारलं की, सर्वात जास्त लव्ह-अफेअर्स कुठे चालतात तर कुणीही सहज उत्तर देतील कॉलेज. हे खरं आहेच. पण असंही एक ठिकाण आहे जिथे लोक प्रेम करण्याची संधी सोडत नाहीत. ते ठिकाण आहे ऑफीस. एका सर्व्हेमधून समोर आलं आहे की, काही लोक ऑफिसमध्ये रोमान्स करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. या सर्व्हेनुसार, ऑफिसमधील एक तृतियांश कर्मचारी सोबत काम करणाऱ्या लोकांसोबत रोमान्स करतात. हा सर्व्हे भारतातील नाही तर कॅनडामध्ये करण्यात आलाय.
www.hrreporter.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व्हेमध्ये ८८५ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. कॅनडाच्या एका ऑफिसमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेतून समोर आले आहे की, कर्मचारी प्रेमाच्या शोधात तर असतात, पण ते ही गोष्ट ऑफिसमधील तिसऱ्या व्यक्तीपासून लपवून ठेवतात.
या सर्व्हेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४५ टक्के लोक त्यांचं अफेअर कुणापासून तरी लपवून ठेवतात. तेच २७ टक्के लोक असेही आहेत, जे त्यांचं अफेअर ऑफिसमध्ये सर्वांपासून गुप्त ठेवतात. या सर्व्हेमधील ३७ टक्के लोकांनी हे मान्य केले की, कॅनडातील लोक ऑफिसमध्ये त्यांचं अफेअर खासकरून एचआरपासून लपवून ठेवतात.
'या' भीतीमुळे लपवतात..
या सर्व्हेमधील ४० टक्के लोकांनी सीनिअर्स आणि मॅनेजमेंटशी संबधित लोकांच्या नजरेपासून त्यांचं रिलेशनशिप लपवल्याची बाब मान्य केली. यामागे अनेकांनी कारण दिलं की, ऑफिसमध्ये अशाप्रकारच्या रिलेशनशिपबाबत काही पॉलिसीच नाहीत. तर ३१ टक्के लोकांनी सांगितले की, ऑफिसमध्ये अफेअर न करण्याबाबत ते जागरूक आहेत. कारण त्यांना हे माहीत आहे की, असं केल्याने त्यांची नोकरी जाऊ शकते.