जर्मनीमध्ये एक महिला आणि श्वानाची मालकीन यांच्यात श्वानांवरून भांडण झाले. यातून संतापलेल्या महिलेने रागाच्या भरात कुत्र्यांच्या मालकीनीचा चावा घेतला. ही घटना पूर्व जर्मनीच्या थुरिंगजिया भागात घडली आहे. महत्वाचे म्हणजे ज्याच्यावरून भांडण झाले, ते श्वान मात्र हा प्रकार शांतपणे झोपून पाहत होते.
दोघींमध्ये कुत्र्यांना शिस्त लावण्यावरून बाचाबाची झाली. 'DW' ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, कुत्र्यांची २७ वर्षे वयाची मालकीन आणि ५१ वर्षांच्या महिलेत हे भांडण झाले. महिलेने तिच्या कुत्र्यांना मारहाण केली होती, असा मालकीनीचा आरोप होता.
मालकीनीने याला विरोध केला, तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. धक्काबुक्की मारामारी सुरु झाली. यामुळे महिला जमिनीवर पडली. यामुळे रागावलेल्या महिलेने कुत्र्यांच्या मालकीनीच्या पायाचा चावा घेतला. मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला त्वरित हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
ही घटना अशासाठी वेगळी आहे, सामान्यपणे मालकाला मारहाण होतेय किंवा त्याच्याशी भांडण होतेय हे पाहिल्यावर पाळीव कुत्रा त्याच्या बचावासाठी धावून जातो. मात्र, इथे दोन्ही श्वानांनी असे काहीच केले नाही. गप्प राहून ते दोघींमधील बाचाबाची, मारहाण पाहत होते.