तुम्ही पिवळ्या रंगाचे जिराफ अनेकदा पाहिले असतील. या जिराफांच्या शरीरावर काळे ठिपकेही असतात. मात्र, केनियातील जंगलात दुर्मीळ पांढरे जिराफ आढळून आले होते. त्यावेळी त्यांची जोरदार चर्चा झाली होती. लोकांमध्ये त्यांना बघण्याची उत्सुकता देखील वाढली होती. या पांढऱ्या जिराफांमधील दोन जिराफांना शिकाऱ्यांनी ठार केलंय. आता केवळ एक मादा जिराफ जिवंत आहे. हा जगातला एकुलता एक पांढरा जिराफ शिल्लक राहिला आहे.
केनियातील इशाकबिनी कन्जर्व्हेशनमध्ये २०१७ मध्ये पांढरे जिराफ आढळले होते. यात एक मादा जिराफ तिच्या पिल्लासह होती. या दोघांनाही ठार करण्यात आलं आहे. फॉरेस्ट रेंजर्सना उत्तर-पूर्व केनियातील गरिसा काउंटी गावात या मादा जिराफ आणि तिच्या पिल्लाचा मृतदेह सापडला.
हे जिराफ ल्यूसिज्म नावाच्या एका जेनेटिक आजाराने ग्रस्त होते. यात त्वचेचा मूळ रंग बदलतो. त्यामुळे ते पांढरे होते.
इशाकबिनी कन्जर्व्हेशनमधील मॅनेजर मोहम्मद अहमदपूर यांनी सांगितले की, मारल्या गेलेल्या दोन्ही जिराफांना तीन महिन्यांआधी पाहिलं गेलं होतं. आता यांच्या मरणाने प्राणी प्रेमी दु:खात आहेत.
अहमदपूर यांनी सांगितले की, या जिराफांना कुणी मारलं याचा तपास सुरू आहे. अजून शिकारी लोकांची ओळख पडलेली नाही. हेही स्पष्ट नाही की, या दोन्ही जिराफांना का मारण्यात आलं.