ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १७ - भारतात मॅगी, मदर डेअरीचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे फ्राय चिकन ऐवजी उंदीर फ्राय करुन दिल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे . केएफसीने हे आरोप नाकारले असून संबंधीत ग्राहकाने केलेल्या आरोपात तथ्त नसल्याचे केएफसीने म्हटले आहे. मात्र तो खाद्यपदार्थ नेमका कशाच्या आधारे तयार करण्यात आले आहे याचे केएफसीने कोणतेही स्पष्टीकऱण दिले नाही.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणा-या डेव्हरॉईस डिक्सन यांनी केएफसीमध्ये फ्राय चिकन मागवले होते. मात्र फ्राय चिकनचा आकार विचित्र असल्याने डिक्सन यांना संशय आला. त्यांनी हा प्रकार केएफसीच्या निदर्शनास आणून दिला असता मॅनेजरने डिक्सन यांची माफी मागितली व ते फ्राय केलेले उंदीरच आहे अशी कबुलीही दिल्याचे डिक्सन यांचे म्हणणे आहे. यानंतर डिक्सन यांनी फ्राय केलेल्या उंदराचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले व अमेरिकेतील केएफसीची सोशल मिडीयावर चांगलीच नाचक्की झाली. अवघ्या काही तासांमध्ये या पोस्टला हजारो लाईक व शेअर मिळाले.
केएफसीने सोशल मिडीयावर युझर्सना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, 'ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील आहे, आम्ही ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतो, मात्र या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे दिसते, आम्ही डिक्सन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही' असे केएफसीने स्पष्ट केले.
डिक्सन यांनी या प्रकरणात केएफसीला कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला असून सर्वांनी केएफसीचे पदार्थ खाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. डिक्सन यांना दिलेले पदार्थ हे फ्राय चिकनच असून त्याचा आकार बदलण्यात आला असावा असे काही युजर्सचे म्हणणे आहे.