अजबच! गावात चांगला पाऊस पडावा म्हणून ढोल ताशे वाजवले, उपसरपंचाला गाढवावरून फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:45 PM2021-07-09T17:45:12+5:302021-07-09T17:46:55+5:30
Jarahatke News: कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात.
भोपाळ - लहरीपणा हे भारतातील मान्सूनचं वैशिष्ट्य आहे. कधी मुसळधार पडणाऱ्या तर कधी गायब होणाऱ्या मान्सुनमुळे शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे नियमित पावसासाठी वरुणराजाला राजी करण्यासाठी देशातीत विविध भागात वेगवेगळे उपाय केले जातात. मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये सोयाबीनच्या पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने आता लोकांनी वरुणदेवाला राजी करण्यासाठी वेगवेगळ्या परंपरांचा आधार घेण्यासा सुरुवात केली आहे. रतलाममधील धराड गावामध्ये पावसाला राजीकरण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या प्रमुखाला ढोल ताशांच्या आवाजात गाढवावर बसवून त्याची गाढवावरून मिरवणूक काढली.
पावसासाठी वरुणदेवाला प्रसन्न करावे लागते आणि तसेच गावाच्या प्रमुखाला गाढवावरून फिरवले की चांगला पाऊस होतो, अशी येथील लोकांची भावना आहे. दरम्यान, रतलाममध्ये पावसाच्या सुरुवातीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र गेल्या १० दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. तसेच त्यामुळे रुसलेल्या वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत.
रतलाममधील धराड गावातील लोकांनी एका अजब परंपरेच्या माध्यमातून वरुणदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. येथे गावचे उपसरपंच मनोज राठोड यांना गाढवावर बसवून फिरवण्यात आले. त्यावेळी ढोल,नगाऱ्यासारखी वाद्ये वाजवली गेली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवतांची पूजा केली आणि चांगला पाऊस पडावा यासाठी गाऱ्हाणे घातले.
दरम्यान, उपसपंचांची गाढवावरून काढलेली मिरवणूक स्मशानात पोहोचलीय तेथे स्थानिक रिवाजानुसार विधा पार पडले. पूर्वीच्या काळी गावात पाऊस न पडल्यास गावचे राजे गाढवावर बसून फिरून देवतांची पूजा करून पावसासाठी प्रार्थना करत असत. त्याच आधारावर आता गावचे सरपंच आणि उपसरपंच हेच गावचे राजे आहेत. त्यामुळे अशी प्रथा पार पाडल्याने वरुणदेवर राजी होऊन चांगला पाऊस पाडतील, अशी अपेक्षा एका ग्रामस्थाने व्यक्त केली आहे.