गुडगाव- बायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाइन ऑर्डर आल्यानंतर खुश होऊन पतीने तो बॉक्स पत्नीला दिला. बॉक्स उघडल्यावर त्यातील सामान पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कंपनीने डिलिव्हरी दिलेल्या बॉक्समध्ये मोबाइल चार्जर, इयर फोन, फोन कव्हरसह सगळ्या एक्ससरीज होत्या पण मोबाइलच्या जागी साबणाची वडी होती. बॉक्समध्ये मोबाइलच्या जागी साबणाची वडी असल्याचं पाहिल्यावर पतीने त्वरीत सोसायटीच्या सिक्युरीटी गार्डची मदत घेऊन डिलिव्हरी बॉयला पकडलं व त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. कंपनीकडे ही तक्रार गेल्यावर कंपनीने तात्काळ त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये मोबाइलची पूर्ण किंमत जमा केली.
प्रिस्टने एस्टेट सोसायटीमध्ये राहणाऱ्या राजीव जुल्का यांनी सांगितलं की, त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पत्नीला गिफ्ट द्यायला अॅमेझॉनवरून आयफोन 7 बूक केला होता. फोनची किंमत 44 हजार 900 रूपये होती. त्यांनी फोन बूक करताना आगाऊ रक्कम भरली होती. दोन दिवसांनी मोबाइलची आज डिलिव्हरी होईल, असा मेसेज राजीव यांना आला. आशीष नावाचा व्यक्ती मोबाइलची डिलिव्हरी देईल, असंही त्या मेसेजमध्ये मोबाइल नंबरसह नमूद करण्यात आलं होतं.
त्यानंतर रविवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास डिलिव्हरी बॉय मोबाइल घेऊन आला. त्यांने सोसायटीमध्ये फोनचं पॅकेट दिल. राजीव यांनी तो बॉक्स उघडल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या बॉक्समध्ये फोनच्या जागी साबणाची वडी होती. बॉक्समध्ये चार्जर, इयरफोन, कव्हर आणि इतर सामान तसंच होतं. राजीव यांनी तात्काळ डिलिव्हरी बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयची कसून चौकशी केली असून अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. अॅमेझॉन कंपनीने डीएलएफ भागात जी फोर एसला डिलिव्हरीचं काम दिलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंगळुरूवरून मानेसर वेअर हाऊसमध्ये त्यांचं सामान येतं. त्यानंतर जीएलएफ टूमध्ये डिलिव्हर होतं. सेक्टर-53 स्थानक प्रभारी इन्स्पेक्टर अरविंद कुमार यांनी सांगितलं की रविवारी संध्याकाळीच बुकिंग करणाऱ्या अकाऊंटमध्ये मोबाइची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली त्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतली.