जगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. अशीच माणुसकी दर्शवणारी एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका नवजात मुलीचा स्विकार करण्यास तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. स्वत:च्या मुलीला त्यांनी निर्दयीपणे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रस्त्याच्या कडेला सोडून दिलं होतं. पण या मुलीचं नशीब बघा तिला चक्क १ हजार लोक आपलं करण्याच्या तयारीत आहेत. रस्त्यावर सापडलेल्या या मुलीला प्रशासनाने 'बेबी इंडिया' असं नाव दिलं आहे.
अमेरिकन पोलिसांनी गेल्या २५ जूनला एक व्हिडीओ जारी केला होता. पोलिसांनी सांगितले होते की, ही चिमुकली त्यांना ६ जूनला रात्री १० वाजताच्या सुमारास एका प्लास्टिक बॅगमध्ये मिळाली होती. सध्या ही मुलगी पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. साधारण दीड मिनिटांचा व्हिडीओ पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओ रिलीज झाल्याच्या तीन दिवसातच जगभरातील १ हजार पेक्षा अधिक लोकांनी या मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. व्हिडीओ जारी करण्यामागे पोलिसांचा हा होता की, या मुलीची ओळख असणारा कुणीतरी समोर यावा.
'पीपुल' च्या रिपोर्टनुसार, पोलिसांना जिथे ही मुलगी मिळाली ते ठिकाण अटलांटापासून ६४ किलोमीटर दूर आहे. दरम्यान, लोकांच्या प्रतिक्रया पाहून पोलिसही भावूक झाले आहेत. Forsyth Country शेरिफच्या ऑफिसकडून अधिकृतपणे लोकांना धन्यवाद देण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले की, मुलीच्या आईचा शोध सुरू आहे.
बेबी इंडिया नावाची ही मुलगी सध्या जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ फॅमिली अॅन्ड चिल्ड्रेन सर्व्हिसेजच्या ताब्यात आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांना ६ जूनला फोन आला होता, ज्यावर सूचना देण्यात आली की, रस्त्याच्या कडेला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत आहे. जेव्हा ही मुलगी पोलिसांना मिळाली त्याच्या काही तासांआधीच तिचा जन्म झाला होता.