अनेक लोकांना कुत्रा पाळण्याची आवड असते. ते आपल्या पाळीव कुत्र्याला सर्व प्रकारच्या सुविधा देताना दिसतात. मनुष्य आणि प्राण्यांची मैत्री फारच मजबूत मानली जाते. खासकरून कुत्रा आणि मनुष्यांची मैत्री उदाहरण देण्यासारखीच असते. गरज पडली तर कुत्रा आपल्या मालकासाठी जीवही धोक्यात घालतो. तेच मालकही आपल्या कुत्र्यांसाठी काही करायला तयार असतात. याचंच एक उदाहरण नुकतंच बघायला मिळालं.
रिपोर्ट्सनुसार, एका मालकाने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवास करण्यासाठी एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइटच्या बिझनेस क्लासचे सर्व तिकीट बुक केले. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे खरं आहे.
बुधवारी मुंबई ते चेन्नई जाणारी एअर इंडियाची फ्लाइट बिझनेस क्लास एका मालकाने आपल्या कुत्र्यासाठी बुक केली होती. एअरबस A320 फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासच्या १२ सीट्स होत्या. या सर्व सीट मालकाने आपल्या कुत्र्यासाठी बुक केल्या होत्या. जेणेकरून त्यांना आरामात प्रवास करता यावा. मुंबई ते चेन्नई दरम्यानच्या दोन तासांच्या उड्डाणासाठी बिझनेस क्लासच्या एका तिकीटासाठी १८ हजार ते २० हजार रूपयां दरम्यानचं असतं. आता तुम्ही अंदाज लावा की, या मालकाने १२ सीटसाठी किती किंमत दिली असेल.
बऱ्याच पाळीव कुत्र्यांनी याआधीही एअर इंडिया बिझनेस क्लासचा प्रवास केला होता. पण कदाचित पहिल्यांदाच एका पाळीव कुत्र्यासाठी एक पूर्ण बिझनेस क्लासचं कॅबिन बुक केलं गेलं होतं. एअर इंडिया एकमेव भारतीय कंपनी आहे जी पाळीव प्राण्यांना पॅसेंजर कॅबिनमध्ये जाऊ देते. एका फ्लाइटमध्ये जास्तीत जास्त दोन पाळीव प्राणी नेण्याची परवानगी असते आणि पाळीव प्राण्यांना शेवटच्या रोमध्ये बसवलं जातं. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान एअर इंडियाने डोमेस्टिक फ्लाइट्समध्ये २ हजार पाळीव प्राण्यांनी प्रवास केला होता.