लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आठ म्हशींचा लिलाव करुन सरकारी खजान्यात आणखी काही रक्कमेची भर घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान निवासातील काही कार्सचा लिलाव करून रक्कम जमा करण्यात आली होती. या म्हशी पंतप्रधान निवासात ठेवण्यात आल्या होत्या, जिथे नवाज शरीफ आणि त्यांचं कुटुंब राहतं होतं. पण आता पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान इमरान खान यांनी खर्चात कपात करण्याच्या आपल्या निर्णयानंतर या म्हशींचा लिलाव केला.
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर येताच इमरान खान यांनी सरकारी खर्चांमध्ये कपात करण्यासाठी काही कठोर पावले उचलली आहेत. पण टिकाकारांचं म्हणनं आहे की, हा केवळ दिखावा आहे. कारण गेल्याच महिन्यात समोर आले की, इमरान खान त्यांच्या घरापासून केवळ १५ किमी दूर असलेल्या ऑफिसामध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
म्हशींचे किती मिळाले पैसे
म्हशींच्या लिलावातून १३ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम जमा केली गेली. याआधी बुलेटप्रूफ कार्सचा लिलाव करून ४ कोटी ३३ लाख रुपयांची कमाई करण्यात आली होती. नवाज शरीफ यांच्या समर्थकांनी या म्हशींप्रति खास प्रेम दाखवले. लतिफ नावाच्या एका व्यक्तीकडे आधीच एक डेरी फार्म आहे. पण त्याला या म्हशी खरेदी करण्याची संधी गमवायची नव्हती. त्याने सांगितले की, 'माझ्याकडे आधीच १०० पेक्षा जास्त म्हशी आहेत. पण आपल्या नेत्याच्या म्हशी मला घ्यायच्या होत्या. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि संधी मिळाली तर या म्हशी मी पुन्हा शरीफ यांना परत करीन'.
लिलावातून किती कमाई
पंतप्रधान कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'लिलावातून आमची अपेक्षेपेक्षा जास्त कमाई झाली आहे. लिलाव यशस्वी झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. पण काही लोक आनंदी नाहीयेत. पण यातून मिळालेली रक्कम सरकारसाठी चांगली गोष्ट आहे'.