मुंबई, दि. 29 - 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय का', हे गाणं एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे की लोक आता हैराण झाले आहेत. आपल्या या मराठमोळ्या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आणि पाहता पाहता हे गाणं इतकं व्हायरल झालं की आता सगळ्याच भाषांमध्ये ते ऐकायला मिळतं. प्रत्येक राज्यात या गाण्याचा व्हिडीओ शूट केलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हिंदीपासून ते गुजराती सगळ्या भाषेत 'सोनू'चं व्हर्जन पाहायला मिळेल. पण आता सोनूने भारताबाहेरही मजल मारली आहे. विश्वास बसणार नाही पण चक्क पाकिस्तानात एका ग्रुपने 'सोनू' गाण्यावर व्हिडीओ शूट केला आहे.
पाकिस्तानात सध्या राजकीय भूकंप आला असून नवाज शरिफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आलं आहे. सगळीकडे यासंबंधी चर्चा सुरु असून या ग्रुपनेही हाच मुद्दा उचलत हे गाणं शूट केलं आहे. पाकिस्तानमधील या ग्रुपने ‘सोनू’वर आधारित भन्नाट व्हिडिओ शूट करुन फेसबुकवर अपलोड केला आहे.
पाकिस्तानमधील ‘कराची विन्झ’ या ग्रुपने हा व्हिडीओ शूट केला आहे. हा ग्रुप स्टँडअप कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. नवाज शरिफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आलेला मुद्दा उचलत त्यांनी एका प्रकारे त्यांची खिल्लीच उडवली आहे. इमरान खान यांच्या तेहरिक ए तालिबान या पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याने त्यांनी इमरान खान यांचं कौतुक केलं आहे. ‘इम्मू (इम्रान खान) हमे आप पे भरोसा सही था’ असे शब्द गाण्यात वापरण्यात आले आहेत.
हे गाणं फेसबूकवर अपलोड करण्यात आलं असून पाकिस्तानात प्रचंड व्हायरल होत आहे. चार लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 34 हजाराहून जास्त लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी भारतीय गाण्याची नक्कल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अनेकांना हे गाणं आवडलं आहे. या गाण्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.