ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलाने सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळे भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल.
येमेनमधील मुकल्ला शहरावर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ताबा मिळवला असून या शहरात पाकिस्तानचे १४८ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तान नौदलाचे पीएनएस अजलत हे जहाज मुकल्ला येथे रवाना झाले होते. शुक्रवारी हे जहाज मुकल्लाजवळ पोहोचले होते. मात्र मुकल्ला बंदराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने पाक नौदलाने बचाव मोहीमेत बदल केला. मुकल्ला ऐवजी हे जहाज अश शिहर बंदराकडे वळवण्यात आले व तिथून १४८ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली. नौदलाच्या जवानांनी पाकच्या नागरिकांसोबत ३५ परदेशी नागरिकांची सुटका करुन माणूसकीचे दर्शन घडवले. ३५ परदेशी नागरिकांमध्ये भारताच्या ११, चीनच्या ८ तर ब्रिटनच्या ४ नागरिकांचा समावेश असल्याचे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. हे जहाज आता पाकच्या दिशेने रवाना झाली असून ७ एप्रिल रोजी हे जहाज कराचीत पोहोचेल असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले.