पोपट आपल्या गोड गोड बोलण्याने कुणालाही आपल्याकडे आकर्षित करुन घेतो. याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. पोपटाचं गोड, चटपटीत बोलणं आणि वेगवेगळे आवाज काढणं तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या सिनेमांमधूनही अनुभवलं असेल. पण एका पोपटाचं हेच वेगवेगळे आवाज काढणं कसं अडचणीत आणू शकतं याचं एक उदाहरण बघायला मिळालं.
ही घटना आहे इंग्लंडची. झालं असं की, येथील डॅव्हेंट्री परिसरातून फायर ब्रिगेड विभागाला फोन गेला की, इथे आग लागलीये. फायर ब्रिगेडवाले पटापट तिथे पोहोचले. पण इथे पोहोचल्यावर कळाले की, ज्या स्मोक अलार्ममुळे आजूबाजूच्या लोकांनी फायर ब्रिगेडला फोन केला होता, तो आवाज एका पोपटाने काढला होता.
Northantsfire या ट्विटर पेजवरुन या मजेदार किस्स्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे की, 'हा फेक अलार्म - हे यासाठी झालं कारण एका पोपटाने फेक स्मोक अलार्मचा आवाज काढला'. जेव्हा फायर ब्रिेगेडच्या जवानांनी स्टीवच्या घराचा दरवाजा वाजवला आणि विचारलं की, काय तुमच्या घरात आग लागलीये? तेव्हा तो म्हणाला की, स्मोक अलार्मच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनी फोन केला. स्टीवने हे सांगितले की, तो त्यांचा पोपट असून तो कधी कधी फेक स्मोक अलार्मचा आवाज काढतो.
ज्या पोपटाने फेक अलार्मचा आवाज काढला त्याचं नाव जॅज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पोपटाला फेक अलार्मचा आवाज काढणं पसंत आहे. हा पोपट आक्रिकन ग्रे प्रजातीचा आहे. हे पोपट वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत.