बस्तर
पोलीस ठाण्यात कोण कशाची तक्रार घेऊन जाईल याचा काही नेम नसतो. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात राहणाऱ्या मनिष यांच्या मालकीचा पोपट पिंजऱ्यातून उडाला. ज्याचा शोध घेण्यासाठी मनिष थेट पोलिसांकडे पोहोचले. पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्यांनी काहीही करा पण माझ्या पोपटाला शोधून काढा अशी मागणी केली. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली आहे.
जगदलपूरमध्ये राहणाऱ्या मनिष ठक्कर यांनी एसएचओ एमन साहू यांना तक्रार पत्र दिलं आहे. माझा पोपट गुंगारा देऊन उडून गेला आहे. त्याचा शोध घेतला जावा. गुरुवारी सकाळी मी पाहिलं तर पिंजरा उघडा होता आणि त्यात पोपट नव्हता. परिसरात शोधही घेतला पण तो कुठंच आढळून आला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केल्याचं मनिष यांनी म्हटलं आहे.
मनिष यांनी सांगितलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबाचा तो लाडका पोपट होता. प्रत्येक सदस्य त्याची खूप काळजी घेत होता. तर पोपटही चांगला रुळला होता. असं असतानाही तो कसा उडून गेला हे काही कळायला मार्ग नाही. हे कुणाचं तरी षडयंत्र असू शकतं आणि मुद्दाम केलेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा शोध घेतला जावा अशी माझी मागणी आहे. यात पोलिसांनी सहकार्य करावं. यासंदर्भात एसएचओ एमन साहू यांनी संबंधित प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून कारवाई केली जात असल्याचं सांगितलं आहे. पोपटाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले गेले असल्याचंही ते म्हणाले.