कानपूर- आपल्याकडील पैसे सुरक्षित रहावेत यासाठी आपण बँकेत पैसे ठेवत असतो. आपला पगार, इतर गुंतवणूक सर्वकाही बँकेच्या माध्यमातून केलं जातं. पण एक अशीही बँक आहे जिथे पैशांच्या ऐवजी अस्थी जमा केल्या जातात. गंगा नदी स्वच्छ करण्याचा विडा उचललेल्या काही लोकांनी ही बँक सुरू केली आहे. या बँकेत अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नाही. ही बँक खास अस्थी ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. या बँकेतील लॉकरमध्ये अस्थी ठेवणारी व्यक्ती एका विशिष्ट काळासाठी त्या बँकेत मृतांच्या अस्थी ठेवू शकते. व त्यानंतर त्यांच्या सुविधेनुसार तेथून ते अस्थी घेऊन जाऊ शकतात व इच्छेनुसार अस्थींच विसर्जन करू शकता.
कानपूरच्या कोतवाली स्टेशन अंतर्गत बनलेल्या भैरव घाटमध्ये स्मशानभूमीच्या जवळच ही कलश बँक असून 2014मध्ये युग दधीची देहदान संस्थेचे संस्थापक मनोज सेंगर नावाची व्यक्ती या बँकेचं काम पाहते. मनोज सेंगर यांनी म्हंटलं,'लोक आधी मृतदेहाला अग्नी देतात त्यांनी अर्धी जळालेली लाकडं, अर्धवट जळालेला मृतदेह गंगेत विसर्जित करतात ज्यामुळे गंगा अस्वच्छ होते. काही लोक अस्थी गोळा करतात पण त्याचं लगेच विसर्जन करत नाही. जास्त लोक अस्थी अलाहाबादच्या संगमात विसर्जित करण्याची इच्छा ठेवतात. अशा लोकांसाठी ही बँक तयार करण्यात आली आहे. यामुळे गंगाही स्वच्छ राहील व लोकांची इच्छाही पूर्ण होईल'.
मोक्षधाम घाटावर येणाऱ्या लोकांना विद्युत शवदाहगृहातही मृतदेहांना जाळण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोक आता विद्युत शवदाहगृहात मृतदेह जाळल्यानंतर अंतिम अवशेषांना या बँकेत जमा करतात.यासाठी संस्थेकडून कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. दरमहिन्याला या बँकेत शंभरहून जास्त अस्थी कलश जमा केले जातात. कलशावर मृताचं नाव, पत्ता लिहून एक कार्ड बनवून दिलं जातं. तीस दिवसांपर्यत जर मृताचे नातेवाईक अस्थी कलश घेऊन गेले नाहीत तर संस्थेकडून ते भू-विसर्जन केलं जातं. लवकरच इतर विविध भागात अशी बँक सुरू केली जाणार आहे.