सेऊल : एकदा वय वाढले की परत लहान होणे तसे अशक्यच, नाही का? लहानपण देगा देवा, असेही प्रत्येकाला वाटते. पण, प्रत्यक्षात तसे काही होत नाही. मात्र, दक्षिण कोरियाचे सुमारे ५ कोटी १० लाख लोक मात्र याबाबतीत भाग्यवान म्हणावे लागतील. रातोरात त्यांचे वय १ ते २ वर्षांनी कमी झाले आहे. होय, तुम्ही वाचले ते खरे आहे. वय कमी होण्यामागचे कारण म्हणजे वयाच्या गणनेबाबत जारी करण्यात आलेला नवा नियम.
द. कोरियाने वय मोजण्याची आपली पारंपरिक पद्धत सोडून जगभर वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, करार आणि इतर अधिकृत दस्तऐवजांसह बहुतेक प्रशासकीय आणि नागरी बाबींमध्ये वयाची गणना उर्वरित जगाप्रमाणेच केली जाईल.
अजबच होती आधीची पद्धत...येथे जन्माला आल्यावर मूल एक वर्षाचे मानले जाते. एवढेच नाही, तर प्रत्येक जानेवारी हे वर्ष म्हणून जोडले जाते. अशा प्रकारे, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जन्मलेले मूल मध्यरात्री दोन वर्षांचे होईल. डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने नियमांमधील दुरुस्तीला मंजुरी दिली होती. नवीन मानकीकरणासह जुन्या प्रणाली अजूनही काही परिस्थितींमध्ये वापरल्या जातील.