लॉकडाऊनमध्ये इमरजन्सी स्थिती बाहेर जाण्यासाठी पोलिसांनी ई-पासची व्यवस्था सुरू केली आहे. रोज देशभरात पोलिसांना ई-पाससाठी शेकडो अर्ज मिळतात. पण केरळच्या (Kerala) एका व्यक्तीने तर हद्द केली. त्याने चक्क शरीरसंबंध ठेवण्यासाठी बाहेर जायचंय म्हणून ई-पाससाठी (E-Pass) अर्ज केला. बाहेर जाण्याचं हे कारण (E Pass Weird Reason) वाचून पोलिसही हैराण झाले. मग काय पोलीस या व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आले आणि त्याची शाळा घेण्यात आली. तेव्हा त्याने जे कारण सांगितलं ते अधिकच हैराण करणारं होतं.
कोरोना महामारीमुळे देशातील जनजीवन बंद आहे. अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लोक घरात राहून कंटाळले आहेत. त्यांचं सामाजिक, मानसिक, आर्थिक संतुलन बिघडलं आहे. शासन-प्रशासनालाही महामारीचा फटका बसत आहे. पोलीस अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
एखाद्या अती महत्वाच्या कामासाठीच एखाद्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर पोलिसांनी ई-पासची सेवा सुरू केली आहे. रोज हजारो ई-पास तयार केले जातात. ऑनलाइन अर्ज करून ई-पास काढली जाऊ शकते. पण देशात विचित्र लोकांची कमी नाही. ते या महामारीतही संधीच्या शोधात असतात.
केरळची ताजीच घटना आहे. कुन्नूर येथील पोलिसांना ई-पाससाठी एक अनोखा अर्ज मिळाला. यात इरिनेव भागातील कन्नापुरमच्या एका व्यक्तीने चक्क शरीरसंबंधाची घरातून बाहेर जाण्याचं कारण सांगत ई-पाससाठी अर्ज केला. या व्यक्तीला सायंकाळी ६ वाजता कन्नूरमध्ये 'कामा'साठी जायचं होतं.
जेव्हा कुन्नूरच्या सहायक पोलीस आयुक्तांनी या व्यक्तीचा ई-पासचा अर्ज पाहिला आणि त्यातील घराबाहेर जाण्याचं कारण वाचलं तर ते संतापले. त्यांनी वेलापट्टनम पोलीस स्टेशनला आदेश दिले की, या व्यक्तीला पकडून त्याची चौकशी करा.
अति घाई संकटात नेई...
केरळच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित वृत्तानुसार पोलिसांनी या अनोख्या कामासाठी ई-पास मागणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. तिथे त्याचा 'सत्कार' झाला. यानंतर त्याने पोलिसांना स्पष्टीकरण देत सांगितलं की, मुळात त्याची लिहिताना चुकी झाली. त्याला सायंकाळी Six वाजता असं लिहायचं होतं. पण त्याजागी Sex लिहिलं गेलं. तो स्पेलिंगमध्ये झालेली चूक सुधारायला विसरला. त्याने घाईघाईत तसाच अर्ज सेव्ह केला. नंतर त्याने पोलिसांची माफी मागितली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.