Peru Temple Found : पेरू(Peru) मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना जमिनीखाली तब्बल चार हजार वर्षे जुने मंदिर सापडले आहे. खोदकामादरम्यान, शास्त्रज्ञांना मंदिराजवळ अनेक मानवी सांगाडेदेखील सापडले आहेत. यावरुन असे दिसून येते की, या भागात त्याकाळी मोठ्या प्रमाणात वस्ती होती. विशेष म्हणजे, मंदिर पेरुच्या जाना भागात सापडले असून, हा संपूर्ण वालुकामय परिसर आहे.
पेरुच्या पॉन्टिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ लुईस मुरो म्हणतात की, हे मंदिर सुमारे चार हजार वर्षे जुने आहे. मात्र, रेडिओकार्बन डेटिंगच्या मदतीने मंदिराचे खरे वय कळेल. हा शोध एका सिद्धांतालाही समर्थन देतो, ज्यानुसार पूर्व उत्तर पेरुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मंदिरे होती.
लुईस यांनी सांगितल्यानुसार, मंदिराच्या एका भिंतीवर मानवी शरीर आणि पक्ष्याचे डोके असलेल्या पौराणिक आकृतीचे चित्रदेखील होते. ही रचना पूर्व हिस्पॅनिक चॅव्हिन संस्कृतीची आहे, ज्यांचे मध्य पेरुच्या किनारपट्टीवर सुमारे 900 बीसीपासून पुढील अनेक शतके वास्तव्य होते.
याशिवाय, मुरो यांनी याच भागात 1,400 वर्षे जुन्या उशीरा मोचे संस्कृतीशी संबंधित मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावाही केला आहे. विशेष म्हणजे, उत्तर पेरुचा समृद्ध इतिहास आहे, जो सुमारे 5,000 वर्षे जुन्या कारल शहरासह हजारो वर्षे जुन्या अवशेषांमध्ये दिसून येतो.