ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीच्या केंद्राच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर काहींनी मोदींच्या या निर्णयावर टीकासुद्धा केली आहे. खात्यात पैसे असूनही अनेकांना बँकेच्या बाहेर पैसे बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावं लागत असल्यानं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र दिल्लीतल्या एका चहावाल्यानं मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत स्वतःच्या ग्राहकांसाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिल्लीत हा चहावाला सध्या चर्चेत आहे. या चहाविक्रेत्याचं नाव मोनू असून, तो आर. के. पुरम सेक्टरमध्ये चहाचा व्यवसाय करतो. मोनूनं नेहमीच्या व्यवसायासाठी पेटीएमद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांची सुट्टे पैसे देण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. मोनूनं पेटीएमची व्यवस्था केल्यानं ग्राहकही या सुविधेचा लाभ घेत असून, मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत. मोनू म्हणाला, "मी हल्लीच पेटीएमची सुविधा वापरू लागलो आहे. ग्राहकांना चहासाठी सुट्टे पैसे देण्यातून सुटका होण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे. तसेच ही सुविधा उपलब्ध करून दिल्यापासून माझ्या ग्राहकांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 7 रुपयांहूनही कमी पैसे असले तरी माणुसकीच्या नात्यातून पेटीएमच्या माध्यमातून मी ते स्वीकारत आहे." दरम्यान मोनूचे ग्राहकही चहावाला डिजिटल झाल्यानं अत्यंत खूश झाले आहेत. एक ग्राहक या निर्णयाचं स्वागत करताना म्हणाला की, चहावाला पेटीएम वापरत असल्यानं आमच्यासाठी ते फायदेशीर ठरत आहे. सुट्टे पैसे खिशात नसताना ही पेटीएमची सुविधा लोकांसाठी फार सोयीस्कर ठरत आहे. मोनूनं पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकही केंद्र सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा सकारात्मकरीत्या विचार करत आहेत. गेल्या आठवड्यात अचानक मोदींनी ही घोषणा केल्यानंतर लोकांची एकच तारांबळ उडाली होती. मात्र एका चहावाल्यानं ऑनलाइन पेमेंटची व्यवस्था करून दिल्यानं अनेकांसाठी त्याचा तो निर्णय प्रेरणादायी ठरत आहे.
Accepting online payments even for as less as Rs 7, my way of helping people and showing support for #DeMonetisation : Monu,Tea stall owner pic.twitter.com/quCQiDtR9G— ANI (@ANI_news) November 13, 2016