वॉशिंग्टन, दि. 31 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. मात्र यावेळी त्याचं चर्चेत येण्याचं कारण भलतंच असून एका महिलेने आपल्या घटस्फोटासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं आहे. फ्लोरिडा मधील पाम बीच काऊंटी येथे राहणा-या लिन आणि डेव्ह अॅरॉनबर्ग यांचा गेल्याच आठवड्यात घटस्फोट झाला आहे. लिन एक चिअरलिडर राहिली असून, तिचा पती डेव्ह अॅरॉनबर्ग एक प्रतिष्ठित वकिल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे, तसंच रिपब्लिकन पक्षाशी संबंधित मुद्द्याचं समर्थन केल्याने आपला घटस्फोट झाल्याचा दावा लिन यांनी केला आहे.
घटस्फोटानंतर पोटगीमध्ये एक बीएमडब्ल्यू कार आणि हजारो डॉलर्स मिळाल्याचं लिन यांनी जारी केलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. आपल्या पतीला लहान मुलांमध्ये काहीच रुची नसल्याने हे नातं संपलं असल्याचंही लिन यांनी सांगितलं आहे. मात्र जी गोष्ट त्यांच्या घटस्फोटासाठी मुख्यत्वे कारणीभूत ठरली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम यांचं समर्थन करणं. यामुळे त्यांचा हा घटस्फोट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.
'मी रिपब्लिकन पक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कट्टर समर्थक आहे. यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या येत असल्याचं माझ्या लक्षात आलं', असं लिन यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टशी लिन यांनी यासंबंधी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'डेव्ह यांना स्टेट सेनेटर असल्यापासून मी ओळखत आहे. मी नेहमीच रिपब्लिकन पक्षाला समर्थन दिलं असून डेव्ह डेमोक्रॅटिक पक्षाचा समर्थक राहिला आहे. सुरुवातीला हा मुद्दा इतका महत्वाचा नव्हता. पण जेव्हा हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढाई सुरु झाली तेव्हा मात्र परिस्थिती बदलली. हिलरी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव जसजसा वाढत गेला, तसतसा आमच्या नात्यातील तणावही जाणवू लागला'.
2012 मध्ये डेव्ह यांची रिपब्लिकन डोनर्सच्या मदतीने स्टेट अॅटर्नी म्हणून निवड करण्यात आली होती. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डेव्ह यांना अनेकदा ट्रम्प यांच्या क्लबमध्ये पाहिलं गेलं आहे. डेव्ह यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळेल असा अंदाजही वर्तवण्यात येत होता'. लिन यांना निवडणुआधी आपण अनेकदा फ्लोरिडा येथील ट्रम्प क्लबमध्ये जात असल्याचं सांगितलं आहे. 'त्यावेळी मी अनेकदा ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढले. मी त्यांच्यासोबत सेल्फीही काढायची. माझे पती मात्र मी फोटो काढू नये, तसंच ते सोशल मीडियावर अपलोड करु नये असं सांगायचे. मात्र मी कधी त्यांचं ऐकलं नाही', असं लिन यांनी सांगितलं आहे.
ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी काढण्यामुळे त्यांच्या नात्यात आणि वैवाहिक आयुष्यात तणाव येऊ लागला. डेव्ह आणि त्यांचे समर्थक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करु नये यासाठी आग्रह करायचे, मात्र लिन यांना फरक पडत नव्हता. अखेर याच मुद्द्यावरुन त्यांचं फिस्कटलं आणि घटस्फोट झाला.