एखादी विचित्र गोष्ट तुमचं नशीब पालटू शकते यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर ही बातमी तुम्ही वाचाच. एका फोटोग्राफरसोबत एक विचित्र प्रकार घडला असून या घटनेने त्याचं नशीबच बदललं आहे. या फोटोग्राफरचं नाव गिल विजन (Gil Wizen) आहे. गिलने त्याच्या घरातील बेडखाली काढलेला एक फोटो एका स्पर्धेत पाठवला, ज्यात त्याला अवॉर्डही मिळाला. गिलला कल्पनाही नव्हती, की अशाप्रकारे अनावधानाने काढलेला फोटो त्याला इतकं प्रसिद्ध करेल.
गिलला अनेक दिवसांपासून त्याच्या बेडखाली विचित्र आवाज येत होते. एका दिवशी त्या आवाजाने त्रासलेल्या गिलने बेडखालील गोष्टीचा फोटो काढला होता. गिलला बेडखाली अंधारात काही दिसत नव्हतं. म्हणून त्याने आपला कॅमेरा काढला आणि फ्लॅश मारुन बेडखालचा फोटो काढला. त्यानंतर फोटोमध्ये त्याने जे पाहिलं, त्या गोष्टीने ते हादरलाच. त्याने बेडखाली जे पाहिलं ते अतिशय धोकादायक होतं. गिलच्या बेडखाली जगातील सर्वात विषारी कोळी हा किटक आपल्या पिल्लांसोबत राहत होता.
हा कोळी ब्राझिलियन वन्डरिंग स्पायडर होता. हा मानवी हाताइतका मोठा असतो. गिलच्या बेडखाली हा विषारी कोळी आपल्या शेकडो पिल्लांसोबत राहत होता. तो कोळी कोणालाही आपल्या पिल्लांजवळ जावू देत नव्हता. गिलने त्याच्या कॅमेरातून याचा फोटो काढला. याच काढलेल्या फोटोपैकी एक फोटोने गिलला फोटोग्राफर ऑफ द ईयर बनवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गिलने फोटो काढण्यासाठी फोर्स्ड पर्स्पेक्टिव्हचा वापर केला होता. त्यामुळे कोळी अधिकच मोठा दिसत होता. ब्राझिलियन वन्डरिंग कोळी सर्वसाधारणपणे जंगलात आढळतात. परंतु हा कोळी या फोटोग्राफरच्या घरात कसा पोहोचला याबाबत कोणतीही माहिती नाही. परंतु रेस्क्यू टीमकडून मोठ्या कोळीसह त्याच्या शेकडो पिल्लांना घरातून हटवण्यात आलं.