लखनऊ: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरानात वास्तव्यास असलेल्या अडीच फुटांच्या अझिम मंसुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक वेगळीच मागणी केली आहे. माझा निकाह लावून द्या, अशी मंसुरी यांची मागणी आहे. माझं लग्न करून द्या आणि दुवा घ्या, असं पोस्टर हाती घेऊन आज मंसुरी यांनी एसएचओंकडे पोहोचले.
गेल्या वर्षी, ९ मार्च २०२१ रोजी अझिम मंसुरी यांचा साखरपुडा हापूडमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत झाला. 'माझी होणारी पत्नीदेखील माझ्याच उंचीची आहे. मुलीकडची मंडळी लग्नासाठी तयार आहेत. मात्र माझे आई, वडील माझं लग्न आता करू इच्छित नाहीत. तीन भावंडांचा विवाह एकाचवेळी होईल, असं ते म्हणतात,' अशा शब्दांत मंसुरी यांनी त्यांची व्यथा मांडली.
कुटुंबीय लग्न करून देत नाहीत. कृपया मदत करा. माझं लग्न करून द्या, अशा मागणीचं पत्र मंसुरी यांनी कैरानाच्या एसएचओ यांना दिलं. 'लग्न करण्याची खूप इच्छा आहे. मला रात्री झोप येत नाही. मी किती त्रस्त आहे, याची कोणालाच कल्पना नाही. माझ्या भावंडांचा विवाह होईलच. पण आधी माझं लग्न करून द्या,' असं मंसुरी म्हणाले.
कुटुंबीयांना अनेकदा सांगूनही ते माझं लग्न करून देत नाहीत. ते चूक करत आहेत. रमझानदेखील होऊन गेला. मी लग्नासाठी रडून रडून दुआ मागितली होती. ईदच्या दिवशी तुझं लग्न करून देऊ, असं आई, वडिलांनी सांगितलं होतं. पण ईद होऊन गेली तरीही माझं लग्न करून दिलं नाही. लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. पण काहीच झालं नाही, अशा शब्दांत मंसुरी यांनी त्यांची समस्या मांडली.