चोर कशासाठी चोरी करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण जपानमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या ६१ वर्षीय चोराचं चोरी करण्याचं कारण वाचून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. या व्यक्तीला १५९ सायकलच्या सीट चोरी करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. टोकियोच्या ओटा वार्ड परिसरात काही दिवसांपासून लोकांनी सायकलची सीट चोरी होण्याची तक्रार केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने अकियो नावाच्या या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. व्हिडीओमध्ये अकियो सहजपणे आणि आरामात सायकलच्या सीट चोरी करताना दिसत आहे. त्यानंतर तो सायकल सीट त्याच्या सायकलच्या बास्केटमध्ये टाकताना आणि तेथून गरपूच जातानाही दिसला. पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून १५९ सायकलच्या सीट ताब्यात घेतल्या.
काय आहे कारण?
अकियोने पोलिसांना सांगितले की, गेल्यावर्षी २०१८ मध्ये कुणीतरी त्याच्या सायकलची सीट चोरी केली आणि नंतर सायकल चोरी केली होती. याने त्याला फार दु:खं झालं होतं. याची तक्रार पोलिसात देण्याऐवजी स्वत:च सूड घेण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आणि म्हणून तो सायकलच्या सीट चोरी करू लागला.
अकियोने पोलिसांना सांगितले की, 'मला नवीन सायकलची सीट खरेदी करावी लागली होती. त्यानंतर मी बदला घेण्याचा निर्णय घेतला. मला लोकांना हे दाखवायचं होतं की, सायकलची सीट चोरी गेल्यावर किती दु:खं होतं'. पोलिसांनी त्याच्या घरातून १५९ सीट ताब्यात घेतल्या आणि अकियोला प्रसारमाध्यमांसमोर सादर केलं होतं. त्यामुळे ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या अकियो पोलिसांच्या ताब्यात असून त्याला कोर्टात सादर केलं जाणार आहे.