नवी दिल्ली- घरांमध्ये चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करून तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सरफराज (वय 26), विश्वजीत ऊर्फ रॉकी (वय 22) आणि शाहदाब अन्सारी (वय 21) अशी या तीन चोरांची नावं आहेत. आरामदायी आयुष्य जगण्यासाठी विशेष म्हणजे गर्लफ्रेण्डला इम्प्रेस करण्यासाठी ते तिघे घरांमध्ये डल्ला मारत होते. अटक केलेले तिघेही उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 बाईक, 7 मोबाइल, 6 महागडी घड्याळं, एक कॅमेरा, एक डिजिटल कॅमेरा, सोन्याची एक बांगडी, एक इंडक्शन कुकर, एक इस्त्री, एक प्रोजेक्टर, 2 कॅमेरा झूमिंग लेन्स, एक रूपयाची 1784 नाणी, 2 रूपयाची 1408 नाणी जप्त केली आहेत. तसंच घराची खिडकी आणि दरवाजे तोडण्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा जप्त करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अॅन्टी ऑटो थेफ्च स्क्वॉडने निजामुद्दीन भागातील अमीर खुसरो पार्कजवळ सापळा रचून या तिघांना अटक केली. त्यावेळी हे तीन चोर चोरीचं सामान योग्य ठिकाणी लपविण्याच्या विचारात होते. तपास सुरू असताना त्यांच्याकडून चोरीचा बराच माल जप्त करण्यात आला. ज्या बाईकवर हे तिघे फिरत होते त्या बाईकही चोरीच्या असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
आणखी वाचा: अजब ! फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून
आरामदायी आयुष्य जगण्यासाठी, गर्लफ्रेण्डला इम्प्रेस करण्यासाठी आणि दारू पिण्यावर हे तिघे खूप पैसे खर्च करायचे. पैसे दाखवून गर्लफ्रेण्डसमोर रूबाब दाखवायला आरोपी चोरी करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. या तिघांना अटक झाल्यानंतर बदरपूर, न्यू फ्रेण्ड्स कॉलनी, न्यू उस्मानपूर आणि नोएडातून दाखल झालेल्या सात चोरीच्या तक्रारींचा गुंतासुद्धा सुटला आहे.