बंगळुरू : कॅनडाच्या धर्तीवर बंगळुरूत गुरुवारपासून घोडेस्वार पोलीस तैनात करण्यात येत आहेत. शहराच्या गस्ती पथकात हे घोडेस्वार पोलीस दुपारी ३ ते रात्री ९ या काळात काम करणार आहेत. कमर्शियल स्ट्रिट, ब्रिगेड रोड आणि क्युबोन पार्क या भागात हे घोडेस्वार पोलीस गस्त घालतील. आगामी काळात म्हैसूर शहरातही घोडेस्वार पोलीस ठेवण्याचा विचार सुरू आहे. बंगळुरूचे पोलीस आयुक्त प्रवीण सुद म्हणाले की, या घोडेस्वार गस्ती पथकाला विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. सध्या या पथकात चार घोडे आहेत. या घोड्यांची संख्या चारवरून ११ करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. घोड्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या घोड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गस्तीसाठी नेण्याकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त घोडे म्हैसूर पोलीस घेऊन जाण्याची शक्यता आहे.
बंगळुरूत घोडेस्वार पोलीस
By admin | Published: March 29, 2017 1:33 AM