उत्तर प्रदेशातील बागपत येथील विद्युत विभागाच्या कार्यालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. ही इमारत इतकी जीर्ण झाली आहे की, छतावरून प्लास्टर कधीही खाली पडू शकतं. प्लास्टर पडून खाली काम करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. प्लास्टरचे तुकडे दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने पडत राहतात. जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालून काम करावे लागत आहे. या कार्यालयात जवळपास 40 कर्मचारी काम करतात.
बागपतच्या बारोट शहरात वीज विभागाची मीटर टेस्टिंग लॅब आहे. ही लॅब ज्या इमारतीत आहे ती इमारत ब्रिटिश काळात बांधली गेली होती. ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करणारे वेदपाल आर्य सांगतात की, प्लास्टरचा तुकडा कधी खाली पडून डोक्यातून रक्त वाहू लागेल, हे सांगता येत नाही. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही डोक्यावर हेल्मेट घालून काम करत आहोत. प्लास्टरचे तुकडे डोक्यावर पडल्याने आमचे अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.
पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. या समस्येबाबत अनेकवेळा वरिष्ठांना निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप काहीही झालेलं नाही. या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणारा कर्मचारी गौरव शर्मा सांगतो की, ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. मी सात वर्षांपूर्वी इथे रुजू झालो. यापूर्वी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करूनही दुरुस्तीचे काम केले नाही. इमारतीचे छत कधीही कोसळू शकते. अधिकारी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत.
हेल्मेट घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बागपतचे डीएम राजकमल यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या संदर्भात पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला पत्र लिहून समस्या लवकर सोडवण्याची विनंती केली असल्याचे ते सांगतात. डीएम म्हणाले की, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा मोडकळीस आलेल्या इमारतीत कार्यालय चालवणे अत्यंत धोकादायक आहे. याबाबत डिस्कॉमकडून चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"