देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के, हे गाणे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. बिहारच्या मोतिहारीमध्ये एका दाम्पत्याच्या बाबतीच असाच प्रकार घडला आहे. गेली पंधरा वर्षे मुलबाळ नसलेल्या या महिलेने एकाच वेळी एक दोन नाही तर चार बालकांना जन्म दिला आहे. नव्हते तेव्हा काही नव्हते आता चार चार मुले सांभाळावी लागत आहेत.
मोतिहारीच्या शंकर सरैया येथील राहणाऱ्या चंदन सिंह यांची पत्नी उषा देवी गेल्या पंधरा वर्षांपासून मुल होण्याची वाट पाहत होती. जवळपास तिने आशाच सोडली होती. परंतू, एक दिवस तिची इच्छा पूर्ण झाली. उषा देवीची झोळी एकाचवेळी चार मुलांनी भरली.
महिलेने एकाचवेळी तीन मुले आणि एका मुलीला जन्म दिला. डॉ. ज्योती झा यांनी सांगितले की, लग्नानंतर अनेक वर्षे यांना मुलबाळ नव्हते. बिहारच्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्यांनी उपचार घेतले होते, परंतू त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती. उपचार सुरु केल्यानंतर तिला गर्भधारणा झाली आणि सात महिन्यांनी तिने चार गोंडस बालकांना जन्म दिला. चारही बालकांना चांगल्या उपचारांसाठी मुझफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.