लंडन : ‘टायटॅनिक’ या जगप्रसिद्ध बोटीला एप्रिल १९१२ मध्ये झालेल्या अपघातातील एक आठवण असलेल्या फरच्या कोटाला लिलावात विक्रमी किंमत आली आहे.या जहाजाला अपघात झाला, त्या वेळी नोकर महिलेने घातलेल्या या कोटला ब्रिटनमध्ये झालेल्या लिलावात १,८१,००० पौंड (२,३२,००० डॉलर्स) मिळाले. हा कोट विकत घेणारा ब्रिटिश नागरिकच आहे. या कोटाला जास्तीत जास्त ८० हजार पौंड मिळतील, अशी अपेक्षा होती. हा कोट मेबल बेनेट या नोकर महिलेचा होता. मेबल यांच्या अंगात नाइट ड्रेस होता. प्रवाशांना वाचवण्यासाठी बोट आल्यावर त्यांनी उत्तर अटलांटिकच्या कठीण अशा वाऱ्यापासून बचाव करण्याकरता पूर्ण लांबीचा कोट अंगात घातला. मेबल त्या अपघातातून वाचल्या. त्यांचे १९७४ मध्ये ९६ व्या वर्षी निधन झाले. बेनेटने यांनी हा कोट १९६० मध्ये त्यांच्या भाचीच्या मुलीला दिला. हा कोट अमेरिकेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या टायटॅनिकच्या फर्स्ट-क्लास स्टेटरूममध्ये आतापर्यंत प्रदर्शनात ठेवला गेला होता व त्याचे खूप लोकांना आकर्षण होते.
फरच्या कोटाची किंमत २.३२ लाख डॉलर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 12:36 AM