आपण सुंदर दिसावं किंवा मग इतर सेलिब्रिटींसारखं दिसावं म्हणून अनेक जण भलतेच प्रयोग करतात. सध्या हव्या तशा चेहऱ्यासाठी कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पण काही वेळा हे जीवघेणं देखील ठरू शकतं. याचा भलताच परिणाम झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता घडली आहे. एका तरुणाला कॉस्मेटिक सर्जरी खूपच महागात पडली आहे. तरुणाचा जीव धोक्यात आला आहे. फॉक्स आईजच्या नादात आता त्याची विचित्र अवस्था झाली आहे.
रयान रूकलेज असं या तरुणाचं नाव आहे. त्याला फॉक्स आय हवे होते. ज्यामध्ये डोळ्यांचा आकार हा कोल्ह्याच्या डोळ्यांसारखा असतो. यासाठी फॉक्स आय थ्रेड सर्जरी (Fox eye thread surgery) केली जाते. रयानने ही कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली. पण त्याची ही हौस त्याला मृत्यूच्या दारात नेईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. सर्जरीनंतर त्याचे भयावह परिणाम समोर आले. यानंतर त्याने आता आपल्या चुकीतून धडा घेत इतरांना असा कारनामा न करण्याचा सल्ला दिला आहे.
रयानच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन झालं. स्टिच केलेल्या भागातून पू निघू लागला. पूर्ण चेहऱ्यात हे इन्फेक्शन पसरलं आणि त्यानंतर त्याची इतकी भयंकर अवस्था झाली की तो मृत्यूशी झुंज देत होता. फॉक्स आय थ्रेड सर्जरीनंतर त्याला इन्फेक्शन झालं ते पूर्ण चेहऱ्यात पसरलं. त्याचा चेहरा सुजला, फुगला. हे इन्फेक्शन त्याच्या चेहऱ्यावर इतक्या प्रमाणात पसरलं की त्याचा जीव गेला असता. पण सुदैवाने तो वाचला. त्याचं नशीब चांगलं होतं ज्यामुळे जखमेत सेप्टिक झालं नाही नाहीतर त्याचा जीव वाचवणं अशक्य होतं.
रयानने टिकटॉकवर आपला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याला आलेला भयंकर अनुभव सांगितला आहे. काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये डोळ्यांजवळ स्टिचिंग आहे त्याचा चेहराही सूजलेला दिसत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी रयानला सहा महिने लागले. जे आपल्यासोबत घडलं ते दुसऱ्या कुणासोबत घडू नये म्हणून त्याने आपले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि अशा कोणत्याही ट्रिटमेंट करून घेऊ नयेत, असं आवाहन लोकांना केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.