पुण्यातील एका पुरस्कार विजेत्या केक आर्टिस्टने १०० किलो वजनाचं वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर बनवत केला जागतिक रेकॉर्ड केला आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची केक आर्टिस्ट प्राची धबल देब (Prachi Dhabal Deb) हिने ही कामगिरी केली आहे. युनायटेड किंगडममधील जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली रॉयल आयसिंगची क्लिष्ट कला शिकलेल्या प्राचीने आता हे यश मिळवले आहे.
याशिवाय प्राची हिनं सर्वाधिक वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चरचा आणखी एक खिताबही जिंकला आहे. तिनं इन्स्टाग्रामवरुन यासंदर्भातील माहिती दिली. "केवळ एकच नाही, तर दोन जागतिक विक्रमाचे टायटल्स" असं तिनं याला कॅप्शन दिलं आहे. याशिवाय तिनं 'आकारमानाने मोठं रॉयल आयसिंग स्टक्र्चर,' असंही तिनं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये नमूद केलं आहे. प्राचीनं भव्य इटालियन मिलान कॅथेड्रल आयसिंगच्या माध्यमातून साकारलं आहे.
"मी यासाठी अनेक वर्षांपासून खुप मेहनत घेतली. या कामाचं कौतुकही झाल्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. माझ्या या कामगिरीची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानपूर्वक दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे," अशी प्रतिक्रिया प्राचीनं दिली. कॅथेड्रल साकारण्यासाठी जवळपास १५०० पिसेसची आवश्यकता असल्यानं त्याच्या नियोजन आणि तयारीला बराच कालावधी लागला. मी एकटीनं प्रत्येक पिस तयार केला आणि त्यानंतर ते पिस एकत्र करण्यासाठी सुमारे एका महिन्याचा कालावधी लागला. या कॅथेड्रलचे सर्व पैलू साकारणं हे एक मोठं आव्हान होतं, परंतु ही प्रतिकृती साकारण्यात आपल्याला आनंद झाल्याचंही तिनं म्हटलं. तिनं साकारलेली मिलान कॅथेड्रलची प्रतिकृती ४ फुट ६ इंच उंच आहे.