काही वर्षांआधी मशरूमबाबत कुणाला काही विचारलं तर क्वचितच कुणाला माहीत होतं. पण आज मशरूम भारतातील घराघरात खाल्लं जातं. मशरूमच्या शेतीबाबत सांगायचं तर यातूनही अनेकजण लाखोंची कमाई करत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा 'मशरूम किंग'बाबत सांगणार आहोत जो वर्षाला यातून १.२५ कोटी रूपये कमावतो आहे.
१९९२ मध्ये पंजाबमधील संजीव सिंह हे एकमेव शेतकरी होते जे मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मशरूमची शेती सुरू ठेवली. आज ते या शेतीतून वर्षाला एक कोटी रूपयांपेक्षा अधिक कमाई करतात.
The Better India सोबत बोलताना संजीव सिंह यांनी सांगितले की, ते त्यावेळी २५ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा मशरूमच्या शेतीबाबत माहिती मिळाली. दूरदर्शनवर येणाऱ्या एका कार्यक्रमातून त्यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी अशाप्रकारची नवी शेती करण्याचा विचार केला.
कशी केली जाते शेती?
यासाठी जास्त जागेची गरज पडत नाही. आजच्या काळात व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून कमी जागेत जास्तीत जास्त शेती केली जाऊ शकते. मशरूमच्या शेतीसाठी मातीची गरज नसते. यात कम्पोस्ट टाकावं लागतं. म्हणजे ऑर्गॅनिक खत.ज्यावेळी संजीव यांनी याची सुरूवात केली होती तेव्हा याबाबत फार टेक्नीक विकसित झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी आधी एक रूम तयार केली आणि मेटलच्या रॅकवर शेती सुरू केली. त्याआधी त्यांनी पंजाबच्या कृषी विद्यापीठातून १ वर्षांचा कोर्स केला. सोबतच मशरूमच्या शेतीची सर्व माहिती गोळा केली. जास्त माहिती नसल्याने सुरूवातीला चुकांमधूनच शिकावं लागलं. दुसरी अडचण ही होती की, याच्या बीया दिल्लीहून मागवाव्या लागत होत्या.
८ वर्षांनी मिळालं यश
८ वर्ष प्रयोग केल्यावर आणि अनेक चुका केल्यावर संजीव यांना यश मिळालं. २००१ मध्ये त्यांना हळूहळू यातून फायदा होऊ लागला होता. यानंतर २००८ मध्ये त्यांची स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली आणि याच्या बीया विकू लागले. काही दिवसात त्यांनी २ एकर जागेवर मशरूमची शेती सुरू केली आणि बीया उगवण्याचं कामही सुरू केलं. या बीया ते दुसऱ्या राज्यात विकत होते. आता काम इतकं वाढलं होतं की, एका दिवसात त्यांना ७ क्विंटल मशरूमचं उत्पादन होत होतं.त्यांचं वार्षिक उत्पन्न दीड कोटी रूपयांच्या आसपास आहे.
बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, संजीव यांना २०१५ मध्ये पंजाब सरकारकडून वेगळ्या प्रकारची शेती करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. पंजाबमध्ये त्यांना मशरूम किंग म्हणून ओळखलं जातं.