जगभरात सोशल मीडिया आता लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकालाच सेलिब्रिटी व्हायचं आहे तर सेलिब्रिटींना सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियात मॅनेजरची गरज पडत आहे. तुमच्यातही सोशल मीडियात मॅनेज करून चर्चेत राहणं, तुमचं काम लोकापर्यंत पोहोचवणं याची कला अवगत असेल तर ब्रिटनच्या राजघराण्यात तुम्हाला नोकरी करण्याची संधी आहे.
राजघराण्याचे सोशल मीडिया अकाऊंट
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांना एका डिजिटल कम्यूनिकेशन ऑफिसर(सोशल मीडिया मॅनेजर) ची गरज आहे. ही नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तीला शाही घराण्याचे सर्वच सोशल मीडिया अकाऊंट हॅंडल करावे लागतील. तसेच राणीला जगासमोर प्रभावीपणे सादर करावं लागेल.
किती मिळणार पगार?
'रॉयल हाऊसहोल्ड'ची वेबसाइटवर या नोकरीबाबत पुरेशी माहिती देण्यात आली आहे. डिजिटल कम्युनिकेशन ऑफिसरला पगार म्हणूण २६, ५८, ८२५ रूपये मिळतील. त्याला आठवड्यातून ३७.५ तास काम करावं लागेल. इतकंच नाही तर अनुभवाच्या आधारावर पगार वाढवला सुद्धा जाऊ शकतो.
आणखी काय सुविधा?
गलेलठ्ठ पगारासोबतच इथे नोकरी करण्याचे अनेक फायदेही आहेत. म्हणजे पेन्शन स्कीममध्ये सहा महिन्यांनी रॉयल पॅलेसकडून पगाराचा १५ टक्के भाग जोडला जाईल. तसेच ३३ सुट्ट्याही दिल्या जातील. तसेच रॉयल पॅलेसमध्ये काम करत असताना दुपारचं जेवणही मोफत दिलं जाणार आहे.
लिहावं सुद्धा लागेल...
या नोकरीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात लिहिण्यात आलं आहे की, ज्याला ही नोकरी मिळेल, त्याच्याकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टला मिलियन व्ह्यूज असले पाहिजेत. सर्वच सोशल मीडियात, डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतच वेबसाइटसाठी कन्टेन्ट सुद्धा लिहावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आमि मेगन मार्कल यांनी मार्च महिन्यात इन्स्टाग्रामवर एन्ट्री घेतली होती. दोघांनाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. अशात आता राणीलाही सोशल मीडियावर यायचं आहे. जर तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर तुम्ही २६ मे पर्यंत अर्ज करू शकता.