माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं काय होतं? याबाबत आपल्याकडे अनेक मान्यता आहेत. ८४ दशलक्ष योनी फिरून आल्यानंतर माणसाला पुन्हा मानवाचा जन्म मिळतो असं आपल्याकडे मानलं जातं. त्यातच एक संकल्पना पुनर्जन्माचीही आहे. हिंदू धर्मात या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. या जन्मात अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा देह धारण करतो, याला पुनर्जन्म असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीचं कर्म कसं आहे, यावर पुढच्या जन्मी तो कोणत्या योनीत जन्माला येईल हे अवलंबून असतं, अशीही आपल्याकडे एक श्रद्धा आहे. संशोधकांच्या मते ही अंधश्रद्धा आहे, पण या साऱ्याला छेद देईल आणि मेलेला माणूस पुन्हा जिवंत होईल, त्याला जिवंत करता येईल, असे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ही संकल्पना खरंच प्रत्यक्षात येईल की नाही, त्यात काही तथ्य आहे की नाही, याबाबत निदान आज तरी काहीही ठामठोकपणे सांगता येत नसलं, तरी मेलेला माणूस पुन्हा जिवंत करता येईल, यावर अनेक विज्ञानप्रेमींचाही विश्वास आहे. त्यादृष्टीनं प्रयत्नही सुरू झाले आहेत. एवढंच नाही, त्यासाठी अनेक धनाढ्य लोकांनी भलामोठा पैसा खर्च करून मृत्यूनंतर आपला देह जतन करून ठेवायला सुरुवात केली आहे. न जाणो, खरंच जर आपल्याला जिवंत होता आलं, पुनर्जन्म घेता आला तर ती संधी कशाला सोडा, असा विचार त्यामागे आहे.
अमेरिकेतील अलकोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशन या संस्थेनं छातीवर हात ठेवून असा दावा केला आहे की, हो, अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल, थोडी वाट पाहावी लागेल, विज्ञान-तंत्रज्ञान अजून थोडं विकसित व्हावं लागेल, पण मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येऊ शकेल. पुनर्जन्माची ही संधी जर तुम्हाला साधायची असेल, तर तुमचा देह मात्र तुम्हाला जतन करून ठेवावा लागेल. तुमचा देह जर नसेल, तर मात्र तुम्हाला पुनर्जन्माचा लाभ घेता येणं अशक्य आहे. याच कारणानं त्यांनी ज्या धनाढ्यांना पुनर्जन्मासाठी आपला मृतदेह जतन करून ठेवायचा असेल, त्यांची नोंदणी आणि मृत्यूनंतर त्यांचा देह जतन करायला सुरुवात केली आहे. कोणालाही या सुविधेचा फायदा घेता येईल असं त्यांचं म्हणणं असलं तरी सध्या तरी केवळ धनाढ्यांनाच हे शक्य आहे. कारण त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा तेच मोजू शकतात. मृत्यूनंतरची ही सेवा अलकोरनं उपलब्ध करून दिलेली असली तरी मरण पावलेल्या व्यक्तीला ते 'मृत' व्यक्ती म्हणत नाहीत. त्यांच्या मते ती 'आजारी व्यक्ती आहे. आज ती काहीही हालचाल करत नसली, त्यात प्राण नसले, तरी कालांतरानं ती पुन्हा हिंदू, फिरू, बोलू लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या मते ती डेड बॉडी नाही, तर एखादी जिवंत, पण आजारी व्यक्ती आहे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही कारणानं झालेला असू द्या, पण त्यातल्या बहुतेकांना नवजीवन मिळू शकतं असं कंपनीचं म्हणणं आहे. ज्यांनी आपला मृतदेह अलकोर कंपनीकडे जतन करून ठेवण्यासाठी दिला आहे, त्यातील सर्वात लहान मुलगी म्हणजे दोन वर्षांची नाओवारात पोंग, २०१५ मध्ये ब्रेन कॅन्सरनं तिचा मृत्यू झाला होता. या मुलीचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. आपली मुलगी जिवंत राहावी, यासाठी त्यांनी जीवाचं अक्षरश: रान केलं, पण ती वाचू शकली नाही. आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून का होईना, आपली मुलगी पुन्हा जिवंत व्हावी असं तिच्या डॉक्टर पालकांना वाटतं आहे.बिटकॉइन या आभासी चलनाला ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकप्रियता आणि मान्यता मिळवून दिली, ते हल फिने यांचा मृतदेहदेखील 'आजारी व्यक्ती म्हणून कंपनीकडे जतन करण्यासाठी देण्यात आला आहे. २०१४ मध्ये पक्षाघातानं त्यांचा मृत्यू झाला होता. एका विशिष्ट पद्धतीनं हे मृतदेह जतन करून ठेवले जातात, त्याला क्रायोप्रिझर्व्हड असं म्हटलं जातं.
२०० मृतदेहांचं जतनाकोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी तसं प्रमाणपत्र दिल्यानंतर आणि त्या व्यक्तीचा मृतदेह जतन करण्याचं ठरल्यानंतर या आजारी व्यक्तीच्या शरीरातील संपूर्ण रक्त काढून घेतलं जातं. तिथे विशिष्ट प्रकारचं एक रसायन भरलं जातं. अतिशय थंड अशा तापमानात हा देह ठेवला जातो. त्यामुळे शरीराची हानी होत नाही. कंपनीकडे आतापर्यंत असे दोनशे मृतदेह आहेत. ज्यांना केवळ आपला मेंदू जतन करायचा आहे त्यांच्यासाठीचा खर्च आहे ५९ हजार पाऊंड्स (सुमारे ६७ लाख रुपये), तर ज्याना आपलं संपूर्ण शरीर जतन करायचं आहे, त्यांच्यासाठीचा खर्च आहे दीड लाख पाऊंड्स (सुमारे २.६५ कोटी रुपये)!