कधी तुम्ही ऐकलंय का की, एखाद्या भंगारवाल्याने भंगारात चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले? होय...पंबाजच्या एका भांगारवाल्याने असंच काहीसं केलंय. पंजाबच्या मानसामधील ही घटना आहे. इथे एका भंगारवाल्याने भारतीय सेनेकडून ६ खराब झालेले हेलिकॉप्टर खरेदी केले. ते घेऊन तो जसा दुकानावर आला हेलिकॉप्टर बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली.
पंजाबमध्ये भंगारचे उद्योगपती मिट्ठू राम अरोरा यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या सरसवा एअरबेसमधून ६ हेलिकॉप्टर खरेदी केले. अरोडा यांनी या ६ हेलिकॉप्टर्ससाठी ७२ लाख रूपये इतकी किंमत चुकवली. प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन आहे. हे एका लिलावातून खरेदी करण्यात आले.
भंगारवाल्याकडून खरेदी करण्यात आलेल्या एकूण ६ कंडम हेलिकॉप्टर्सपैकी एक मुंबईच्या व्यक्तीने खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर्स लुधियानाच्या एका हॉटेल मालकाने खरेदी केले. इतर तीन हेलिकॉप्टर घेऊन अरोरा मानसाला पोहोचले. सद्या हे हेलिकॉप्टर्स लोकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहे.
भंगारवाल्याच्या दुकानात उभे असलेल्या या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी एकद गर्दी केली आहे. लोक हेलिकॉप्टरसोबत सेल्फी घेत आहेत. मिट्ठू राम अरोराने सांगितलं की, लिलावानंतर ट्रॉलिंच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर मानसा येथे आणले. मिट्ठू रामने सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरची खरेदी केली. आता ते बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.