Raksha Bandhan: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस राखीपोर्णिमेचा सण असला तरी आतापासूनच बाजारात राख्या दिसू लागल्या आहेत. दरवर्षी काही वेगळ्या प्रकारच्या राख्या पाहायला मिळतात. यावेळीही काही अनोख्या राख्या पाहायला मिळणार आहेत. काही कारागिरांनी मिळून शेणाच्या राख्या तयार केल्या आहेत. महिला शेणखताचा वापर करून उत्कृष्ट राख्या बनवत असून, या राख्यांना खूप मागणीदेखील आहे. पूर्वी भारतीय बाजारपेठेत चायनीज राखीचा ट्रेंड होता, मात्र यावेळी शेणाचा वापर करून राखी बनवली जात आहे आणि ही राखीही परवडणारी आहे.
शेणापासून बनवलेल्या राखीला भरपूर मागणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील राखी व्यावसायिकाने सांगितले की, आतापर्यंत इतर अनेक गोष्टींमध्ये शेणाचा वापर केला जात होता, परंतु यावेळी आम्ही राखीमध्ये त्याचा वापर केला आहे. यामुळे एकूण 15 महिलांना रोजगार मिळाला असून यातून अनेक फायदे होतील. शेणापासून बनवलेल्या राखी भावांना रेडिएशनपासून वाचवण्याचे काम करेल. ते तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शेण वाळवून त्याची पावडर बनवून मग त्याची राखी बनवली जात आहे. आता त्याची मागणी केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर अनेक राज्यांमध्ये आहे, कारण ती अत्यंत कमी किमतीत विकली जाते.
अशा बनवल्या जातात राख्या
गाईच्या शेणाची पावडर व पेस्ट बनवली जाते आणि मग ती साच्यात ओतली जाते, जी राखी बनवण्यासाठी वाळवली जाते. यानंतर स्त्रिया स्वतःच्या हातांनी ती राखी सजवतात. यूपी व्यतिरिक्त तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये राखी विकली जात आहे आणि लोकांना राखी खूप आवडते. या राख्यांची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. सर्वात कमी किमतीची राखी 5 रुपये आहे. ही राखी विविध राज्यात पोहोचल्यानंतर इतर राज्यात राखी विकण्याची किंमत ते-ते दुकानदार ठरवतात असे त्या महिलेने सांगितले.