तुम्ही अनेकदा प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्या अनेकदा पाहिला असेल. सामान्यपणे बिबट्याचा रंग पिवळा असतो आणि त्यावर काळे ठिपके असतात. पण आफ्रिकेमध्ये एक दुर्मिळ बिबट्या आढळला आहे. हा बिबट्या पूर्णपणे काळ्या रंगाचा आहे. काळ्या रंगात हा बिबट्या आणखीनच रूबाबदार दिसतो.
मोगली सिनेमात किंवा कार्टून्समध्ये तुम्ही बगीरा पाहिला असेल तसाच हा बिबट्या आहे. या दुर्मिळ काळ्या बिबट्याचा फोटो ब्रिटनचा फोटोग्राफर विल बुरार्ड लुकस याने काढला आहे. त्याने सांगितले की, आफ्रिकेत १०० वर्षात पहिल्यांदाच काळ्या बिबट्याला कुणी कॅमेरात कैद केलंय.
विल हा ३५ वर्षीय तरूण आहे. त्याने सांगितले की, पौर्णिमेची रात्र होती...चंद्र कमालीचा चमकत होता आणि हलकी पाऊसही होत होता. त्यावेळी हे फोटो काढले गेले. विल हा इथे सध्या एका बायोलॉजिस्टसोबत काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून काळा बिबट्या बघितला गेल्याची चर्चा परिसरात होती. त्यानंतर विलने एका सुरक्षित जागेवर कॅमेरा सेट केला होता.
विलने यावर काही खास उपकरणंही लावले होते. त्यात वायरलेस मोशन सेंसर, हाय क्वालिटी डीएसएलआर कॅमेरा आमि तीन फ्लॅश लाइट्सचा समावेश होता. विलने ज्या बिबट्याचा फोटो काढला तो मादा बिबट्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. आणि वयही कमी आहे.
विल सांगतो की, 'या परिसरातील लोकांना चिंता आहे की, काळा बिबट्या शिकाऱ्यांच्या निशाण्यावर तर नाही ना. केनियामध्ये याप्रकारच्या शिकारीवर बंदी आहे. मला असं वाटतं की, इथे पर्यटनाला चालना मिळावी'.