(Image Credit : smh.com.au)
कधी कधी असं होतं की, आपल्या घरातच अशा काही किंमती वस्तू असतात, पण आपल्याला त्याबाबत काहीच माहीत नसतं. मात्र, जेव्हा त्याबाबत कळतं तेव्हा आश्चर्य होतं. असंच काहीसं फ्रान्समधील कॉम्पेनियन शहरात राहणाऱ्या एका महिलेसोबत झालंय. या महिलेच्या किचनमध्ये अनेक वर्षांपासून एक पेंटिंग भिंतीवर टांगलेली होती, पण तिला त्या पेटींगची किंमत माहीत नव्हती आणि जेव्हा तिला ती कळाली तेव्हा ती रातोरात कोट्याधीश झाली.
फिलोमेन वोल्फ नावाच्या महिलेने पेंटिंग किचनमध्ये टांगलेली होती. तिने सांगितले की, ही पेंटिंग तिला सामान्य वाटत होती. परिवाराने धार्मिक प्रतिक म्हणून ही पेंटिंग घरात ठेवली होती. तिला या पेंटिंगबाबत तेव्हा कळाले जेव्हा ती घर विकत होती.
(Image Credit : cbc.ca)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने यावर्षीच जूनमध्ये तिचं जुनं घर विकून नवीन घर घेण्याचा विचार केला होता. हे घर १९६० मध्ये बांधलेलं होतं. त्यामुळे या घरातील वस्तूंची किंमत ठरवण्यासाठी लिलाव तज्ज्ञांना बोलवण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी पेंटिंगची जी किंमत लावली ती ऐकून महिला आश्चर्यचकित झाली.
तज्ज्ञांनुसार, ही पेंटिंग १३व्या शतकातील आहे. मानलं जात आहे की, ही पेंटिंग १२८० सालात तयार करण्यात आली होती. इटलीचे प्रसिद्ध चित्रकार चिमाबुए यांनी ही पेंटिंग काढली. चिमाबुए यांनी सेनी-डी-पेपो या नावानेही ओळखलं जातं.
(Image Credit : news.artnet.com)
या पेंटिंगची किंमत ३१ कोटी रूपये ते ४६ कोटी रूपयांदरम्यान सांगितली जात आहे. एका रिपोर्टनुसार, सेनी-डी-पेपो यांनी ख्रिस्ती समुदायाच्या भावना दाखवणाऱ्या अशा ८ पेंटिंग काढल्या होत्या. ही पेंटिंग सुद्धा त्यापैकी एक आहे. अशाच दोन पेंटिंग लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
(Image Credit : Social Media)
या दुर्मिळ पेंटिंगबाबत महिलेने सांगितले की, तिला हे माहीत नाही की, पेंटिंग कुठून आली किंवा तिच्या परिवाराला कशी मिळाली. तसेच किती वर्षांपासून तिच्या घरात आहे हेही तिला माहीत नाही. आता या पेंटिंगचा लिलाव २७ ऑक्टोबरला होणार आहे. या पेंटिंगसोबतच महिलेच्या घरात आणखीही काही दुर्मिळ वस्तू सापडल्या आहेत. त्यांचीही किंमत साधारण ४ लाख ६५ हजार रूपये सांगितली जात आहे.