Pokemon Cards Collection Auction: इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायरमधील एका व्यक्तीच्या पोकेमॉन कार्ड जमवण्याचा छंद त्याला चांगलाच फायद्याचा ठरला. त्याने केलेला कार्ड्सचा संग्रह पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्या व्यक्तीने 1990 पासून ते 2000 पर्यंत प्रसिद्ध ॲनिमेटेड मालिकेची सर्व कार्ड्स गोळा केली होती. या व्यक्तीचा संग्रह आता 'अतिदुर्मिळ' श्रेणीत झाला आहे. एवढेच नाही तर या कार्ड्सचा लिलावही लाखोंच्या घरात झाला.
बीबीसीच्या एका अहवालानुसार, 2407 कार्ड्सचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये 10 पूर्ण कार्ड सेट आणि 15 मास्टर सेट समाविष्ट आहेत. कार्ड्सचे प्रत्येक प्रकार त्यात उपस्थित होते. याव्यतिरिक्त, संग्रहातील दुसऱ्या श्रेणीमध्ये पोकेमॉन बॉक्स टॉपर्स नावाच्या 16 मोठ्या आकाराच्या आवृत्त्याही होत्या.
लिलावापूर्वी लिलावकर्ते रिचर्ड विंटरटन म्हणाले होते की, या संग्रहाचा लिलाव 25 हजार युरो (सुमारे 26 लाख रुपये) पर्यंत जाऊ शकतो. मात्र खरे पाहता याच्या दुप्पट किमतीत त्याचा लिलाव करण्यात आला. याचे कारण त्याची दुर्मिळता होती. यापैकी काही कार्ड्सना अशी मागणी होती की खरेदीदार कदाचित एका कार्डसाठी संपूर्ण सेटची बोली लावताना दिसले.