उंदरांचे वेगवेगळे कारनामे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. बघा म्हणजे उंदरांचं जीवन किती सुखी आहे. कधी फुकट दारू पितात, तर कधी एटीएममधील लाखोंच्या नोटा कुरतडत बसतात. महत्त्वाची बाब म्हणजे यांच्यावर कोणती केसही होत नाही. ताजं प्रकरण आहे एका हायप्रोफाइल चोरीचं. बिहारमधील एका ज्वेलरी शॉपमधून लाखो रूपयांचे हिरे गायब झाले आहेत. आधी दुकानातील कर्मचाऱ्यांवर संशय होता. पोलीस तपास करत होते, जेव्हा यावरून पडदा उठला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
'न्यूज 18' ने दिलेल्या वृत्तानुसार, पटणा येथील एका ज्वेलरी शॉपमधील लाखो रूपयांचे हिरे एकाएकी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. मालकाला सर्वात आधी संशय आला तो कर्मचाऱ्यांवर. त्यांना विचारपूस केली गेली पण समोर काही आलं नाही. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. सुरूवातीला पोलिसही हिरे गेले कुठे म्हणून चक्रावून गेले होते. पण जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा सर्वांनासमोर खुलासा झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाच्या सीलिंगमध्ये दडून बसलेले उंदरं चोर निघाले. ही उंदरं दुकानाच्या एका कोपऱ्यातून आत शिरले आणि त्यांनी स्टॉकमधून हिरे लंपास केले. सीसीटीव्हीमध्ये हे स्पष्टपणे दिसले की, कशाप्रकारे उंदरं ज्वेलरीचे पॅकेट्स दातांमध्ये घेऊन पसार झाले.
फुटेजमध्ये हे सुद्धा दिसलं की, उंदरं हिरे चोरून दुकानाच्या फॉल्स सीलिंगमध्ये शिरले. त्यामुळे संपूर्ण दुकानाची धुळ चाळूनही हिरे मिळाले नाहीत. अजूनही सीलिंगच्या आत हिऱ्यांचा शोध सुरू आहे. सध्या ही चोरी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच उंदरांनी सरकारी दारू फस्त केल्याची घटना समोर आली होती. तर एका एटीममधील नोटाही काही उंदरांनी खाल्ल्या होत्या.