भारतात उंदरांच्या कारनाम्यांची यादी बरीच मोठी आहे! ते कधी हजारो लिटर दारूच फस्त करतात, तर कधी गांजा संपवतात. आता तर भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये उंदराने असा कारनामा केला, की क्षणात संपूर्ण डबा रिकामा झाला. हो हे खरे आहे. रात्रीची वेळ होती. थंडीही खूप होती. यामुळे प्रवासी पांघरून घेऊन झोपले होते. अचानक फायर अलार्म वाजू लागला. प्रवासी झोपेतून खडबडून जागे झाले. नेमके काय झाले त्यांना कळेना. त्यांची पळापळ उडाली. काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. ट्रेनमध्ये कसल्याही प्रकारची आग वैगेरे लागली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण, चौकशी केली असता एका उंदराने फायर अलार्म वाजवल्याचे समोर आले.
प्रवाशांनी तत्काळ रिकामी केली बोगी - माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना 4 डिसेंबरला (बुधवारी) मुझफ्फरपूरहून दिल्लीला जाणाऱ्या 'सप्तक्रांती एक्सप्रेस'मध्ये घडली. रात्रीचे ३ वाजले होते. ट्रेन शाहजहांपूर जिल्ह्यातील बंथारा येथे पोहोचली असता थर्ड एसीच्या B1 डब्यात अचानकपणे मोठ-मोठ्याने फायर अलार्म वाजू लागला. प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि प्रवासी ट्रेनमधून उतरून दूरवर उभे राहिले. यानंतर, रेल्वेच्या लोको पायलटने मॅकॅनिकल स्टाफ आणि रेल्वे कंट्रोल माहिती दिली.
तपासानंतर झाला असा खुलासा -यानंतर तपास सुरू झाला आणि अलार्म सिस्टिमचा बॉक्स उघडण्यात आला. यात एक मेलेला उंदीर आढळून आला. अर्थात हा अलार्म उंदरामुळे वाजल्याचे समोर आले. यानंतर उंदीर बाहेर फेकण्यात आला आणि अचानक ट्रेन पुढे जाऊ लागली. मात्र, यातच काही प्रवासी खाली राहिल्याने त्यांच्या नातलगांनी ट्रेनची चेन ओढली. हा संपूर्ण प्रकार व्यवस्थित व्हायला जवळपास एक तास लागला. ट्रेन आधीच एक तास उशिराने धावत होती. अखेर ती पुन्हा पहाटे 4.30 वाजता रवाना झाली.