(Image Credit : www.foap.com )
लिफ्ट ही फारच मोठी क्रांती मानली जाते. कारण 50 मजल्यांवर पायऱ्यांनी चढून जाणे हे ऐकायलाही धक्कादायक आणि करायलाही. पण ज्यांनी लिफ्टची निर्मिती केली त्यांच्या केवळ इंजिनिअरींगचाच हा भाग होता असं नाहीये. लिफ्टमधील संगीत, आरशे यावरुन या गोष्टी फारच विचारपूर्वक केल्याचं दिसतं.
सुरुवातीच्या काळात लिफ्टमध्ये लोक उभे रहायचे तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काही नसायचं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू वर जायची. यावर लोक संतापायचे. अनेकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही लिफ्ट कंपन्यांनी यावर काय उपाय करता येईल यावर विचार सुरु केला. पण हे काम महागडंही होतं. काही कंपन्यांनी वेगाने वर जाणाऱ्या आणि सुरक्षित लिफ्ट तयार करायला सुरुवातही केली.
मात्र एका कंपनीच्या इंजिनिअरने हा मुद्दा मांडला की, आपल्या लिफ्टचा स्पीड बरोबर आहे. लोकंच मुर्ख आहेत. लोकं असा विचार करतात की, लिफ्ट हळुवार जाते. या एका स्टेटमेंटवर त्या कंपनीने वेगळ्या विचाराने काम सुरु केलं. या कंपनीने लिफ्टच्या वेगात बदल करण्यापेक्षा त्यातील लोकांवर लक्ष केंद्रित केलं. खरंच लिफ्ट स्लो आहे का? लोक असा विचार का करतात? त्यांना लिफ्टमध्ये कसं सहज करता येईल? याचा विचार कंपनीने सुरु केला.
या कंपनीने लिफ्टमध्ये चढणाऱ्या लोकांच्या विचारांचा अभ्यास केला. ते असा का विचार करतात? याचा विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, लोकांना लिफ्टमध्ये करण्यासाठी काहीच नसतं. फक्त भीतींकडे पाहणे आणि लिफ्ट पडणार तर नाही ना या गोष्टीचा विचार करणे इतकेच त्यांच्या मनात सुरु असते. यातून असा विचार समोर आला की, लिफ्टमध्ये आरसा लावल्यास लोकांचं लक्ष भीतीवरुन डायव्हर्ट करता येऊ शकतं. आरसा लावल्यास ते केस नीट केले नाही हे बघू शकतात. महिला त्यांचं मेकअप कसं झालंय, हे बघू शकतात.
या कंपनीने त्यांच्या लिफ्टमध्ये, लिफ्टच्या स्पीडमध्ये कोणताही बदल न करता आरसे लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक सर्व्हे केला. त्यात त्यांनी आता लिफ्टचा वेग कसा वाटतो? प्रश्न लोकांना विचारला. त्यावर अनेकांनी आता वेग बरोबर असल्याची उत्तरे दिली. मुळात त्या लिफ्टच्या वेगात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण हे करण्यामागे माणसशास्त्रीय कारण होतं.