डोळ्यांतून अश्रू (Tears) येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. डोळ्यांतून अश्रू येण्याचा आणि मनातल्या भावभावनांचा निकटचा संबंध असतो. कधी अतीव दुःखामुळे, तर कधी आनंदामुळे (Happiness) अश्रू येतात. मनाला एखाद्या गोष्टीमुळे, घटनेमुळे, कुणाच्या बोलण्यामुळे दुःख झालं तर डोळे पाणावतात. एखाद्या शारीरिक वेदनेमुळेही डोळ्यांत टचकन अश्रू येतात. काही जणांना खूप आनंद झाला, की त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात; पण बहुतांश जणांना केवळ रडताना अश्रू येतात. रडण्याचा, भावनांचा आणि अश्रूंचा संबंध कसा असतो, हे जाणून घेऊ या. रडताना अश्रू येण्यामागे शास्त्रीय कारण आहे.
अतीव दुःखामुळे, भावना दुखावल्यामुळे व्यक्तीला रडू येऊ शकतं. रडताना डोळ्यांतून अश्रू पाझरू लागतात. यामागे काही कारणं आहेत. जेव्हा आपण कोणत्याही भावनेच्या टोकाला पोहोचतो तेव्हा आपले डोळे भरून येतात. याचं कारण असं, की जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते, तेव्हा शरीरात काही विशिष्ट क्रिया होतात. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटला किंवा दुःख झाल्यास अशी क्रिया घडून येते. यामुळे शरीरातल्या हॉर्मोन्समध्ये (Hormones) अनेक बदल होतात. त्यात अॅड्रिनालिनच्या (Adrenaline) पातळीचाही समावेश असतो. हॉर्मोन्स बदलाचा आणि डोळ्यांचा संबंध असतो. या बदलामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात. बहुतांश भावना (Emotion) याच पद्धतीनं शरीरावर परिणाम करताना दिसतात. भावनांच्या आवेगामुळं रडू येणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
याशिवाय, कांद्यातल्या रसायनांमुळेही (Chemicals) डोळ्यांतून अश्रू येतात. या रसायनाला सीन-प्रोपेंथियल-एस-ऑक्साइड असं म्हटलं जातं. कांदा कापताना त्यातल्या रसायनांमुळे डोळ्यांतल्या अश्रू ग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येतात. कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येऊ नये, यासाठी कांदा कापण्याची पद्धत बदलावी.
याव्यतिरिक्त, डोळ्याला संसर्ग (Infection) किंवा अॅलर्जी झाल्यास डोळ्यातून पाणी येतं. या संसर्गाला वॉटरी आइज (Watery Eyes) असं संबोधलं जातं. डोळ्याच्या अनुषंगानं अन्य काही समस्या असल्यास डोळ्यातून पाणी येतं. त्याच प्रमाणे जोरदार वाऱ्यांमुळेही डोळ्यातून पाणी येतं; मात्र या दोन्ही बाबींपेक्षा मनाला आनंद झाल्यास किंवा तीव्र दुःख झाल्यास डोळ्यातून अश्रू येणं ही बाब तुलनेनं अधिकवेळा दिसून येते.