Vikas Divyakirti, Advice before Marriage : लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. एखाद्याशी आयुष्यभराचे बंध जुळवण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला नीट जाणून घेणे महत्त्वाचे असते. अर्धवट माहिती असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केल्यास काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. मोटिवेशनल स्पीकर विकास दिव्यकिर्ती हे तरूणाईमधील एक लोकप्रिय असे नाव आहे. डॉ. विकास दिव्यकीर्ती हे दृष्टी IAS चे संस्थापक आणि 1996 च्या बॅचचे IAS आहेत. ते इंटरनेटवर तरुणांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मते, मुलींनी लग्न करण्यापूर्वी मुलांना एक विशेष प्रश्न विचारला पाहिजे. जाणून घेऊया त्याबाबत...
लग्नाआधी मुलीने मुलाला हा एक प्रश्न नक्की विचारावा-
डॉ. विकास दिव्यकीर्ती मुलींना सल्ला देतात की, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला लग्नासाठी प्रश्न विचाराल तेव्हा त्यात एक प्रश्न नक्की विचारा. तो प्रश्न म्हणजे, तुम्ही शेवटचे कधी रडला होतात?
'हे' उत्तर असेल तरच लग्न करा
दिव्यकिर्तींच्या मते, जर मुलाचे उत्तर असे असेल की आम्ही रडत नाही किंवा लहानपणी शेवटचे रडलो, तर मग तो कोणत्याही पदावर असला तरीही त्याच्याशी लग्न करू नका. कारण जी व्यक्ती गेली अनेक वर्षे रडली नाही, ते भावनेला फारसे महत्त्व देणारे नसतात.
यामागचे 'लॉजिक' काय?
एखादी भावनिक गोष्ट घडते तेव्हा तुम्ही रडत असाल तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असले पाहिजे, कारण याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या गोष्टीची काळजी वाटते. असे झाले नाही तर अश्रू बाहेर पडत नाहीत, असेही मत त्यांनी मांडले. सहज रडणारी व्यक्ती खूप भावनिक असते. असे लोक जीवन खूप खोलवर जगतात आणि इतरांनाही सहसा दुखवत नाहीत, असे दिव्यकिर्ती यांचे मत आहे.
रडण्यासंदर्भात अभ्यासात समोर आली ही बाब
रडण्याच्या क्रियेबाबतच्या अभ्यासात असे दिसून आले की जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते तेव्हा डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन रसायने आढळतात, ज्यामुळे चांगले वाटण्यास मदत होते आणि शारीरिक आणि भावनिक वेदना कमी होतात. याचा निष्कर्ष असा आहे की रडण्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत बनतात.